कुठलाही मतदारसंघ निवडा अन् निवडून येऊन दाखवा; नवनीत राणा यांचे मुख्यमंत्र्यांना चँलेज!

मुंबई : हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कुठलाही मतदारसंघ निवडावा आणि जनतेतून निवडणूक लढवावी. मी तुमच्या विरोधात उभी राहणार आहे. तुम्ही जनतेतून निवडून येऊन दाखवा, असे थेट आव्हान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर झालेल्या नाट्यानंतर खा.नवनीत राणा आणि त्यांचे पती आ. रवी राणा यांना अटक करण्यात आली. १२ दिवस तुरुंगात काढल्यानंतर खा.नवनीत राणा यांची गुरुवारी जामिनावर सुटका झाली आणि त्याच दिवशी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर आज रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच नवनीत राणा चांगल्याच आक्रमक झाल्याचे दिसून आले. पत्रकारांशी बोलताना नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर पुन्हा कडाडून टीका केली. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की, उद्धव ठाकरेंमध्ये दम असेल, तर माझ्याविरुद्ध कोणत्याही जिल्ह्यातून निवडणूक लढून दाखवा. जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवा. महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा निवडा, मी तुमच्या विरोधात निवडणुकीत उभी राहून लढून दाखवेल. नारीशक्ती काय असते हे तुम्हाला दाखवून देऊ. तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असे नवनीत राणा म्हणाल्या. रामाच्या आणि हनुमानाच्या नावावर सरकारने ज्या प्रकारे माझ्यावर अत्याचार केला त्याचे उत्तर महाराष्ट्राची जनता यांना नक्की देईल. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मी शिवसेनेच्या विरोधात पूर्ण ताकदीने प्रचार करणार असून शिवसेनेला सत्तेतून खाली खेचणार असल्याचे नवनीत राणांनी यावेळी म्हटले.

संजय राऊतांचा ‘पोपट’ असा उल्लेख

मुंबई महापालिकेवर गेल्या दोन पिढ्यांपासून शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेकडूून मुंबई महापालिकेत सत्तेचा गैरवापर सुरू असून, भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. मी मुंबईची मुलगी आहे. येणाऱ्या काळात मुंबईची जनता आणि रामभक्त भ्रष्टाचाराची लंका उदध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. राम आणि हनुमानाच्या नावाला विरोध करणाऱ्यांसोबत काय होते हे त्यांना निवडणुकीत जनता दाखवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खा. नवनीत राणा यांनी शिवसेना नेते खा.संजय राऊत यांचा ‘पोपट’ असा उल्लेख करत आज पुन्हा एकदा राऊतांवर निशाणा साधला.  ज्या पद्धतीने पोपटाने नागपूरच्या पत्रकार परिषदेत २० फूट खोल खड्ड्यामध्ये गाडू असे म्हटले होते. येणाऱ्या काळात मुंबई आणि महाराष्ट्राची जनता त्यांना खड्ड्यात टाकणार आहे यात काही दुमत नाही. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मी दिल्लीला जाणार आहे आणि त्यांच्याविरोधात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहे, असे नवनीत राणा म्हणाल्या.

महाविकास आघाडी सरकारला मी घाबरत नाही
क्रूरपणे एका महिलेवर जी कारवाई झाली ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. डॉक्टरांनी माझी तातडीने तपासणी होऊन उपचार होणे गरजेचे असल्याचे लिहून दिले तरी उपचार देण्यात आले नाहीत. तुरुंगात माझे मानसिक शोषण झाले. आज मी डॉक्टरांना विनंती करून डिस्चार्ज घेतला आहे. अजूनही माझ्या बऱ्याच तपासण्या बाकी आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. याची तक्रार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे करणार असून, दिल्लीत जाऊन संजय राऊतांचीही तक्रार करणार आहे. महाविकास आघाडी सरकारला मी घाबरत नाही, असे नवनीत राणा यांनी सांगितले.

Share