देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा, प्रवाशांचे लाखोंचे ऐवज लुटले

औरंगाबाद : रेल्वे सिग्नलवर कपडा टाकून दरोडेखोरांनी औरंगाबादहून मुंबईकडे जाणारी देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा टाकला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री पोटूळ रेल्वेस्थानकाच्या जवळ घडली. रेल्वे थांबताच तुफान दगडफेक करत दरोडेखोरांनी प्रवाशाची सोन्याची साखळी हिसकावून पलायन केले.

रेल्वे लुटल्याच्या तीन घटना गेल्या वीस दिवसांमध्ये घडल्या आहेत. पहिल्या दोन घटनेनंतर रेल्वेच्या सिग्नललाच ‘खडा पहारा’ देऊन ‘नजर’ ठेवण्याचा दावा प्रशासनाने केला़ होता. मात्र, पोकळ दावा असल्याचे गुरुवारच्या दरोड्याच्या घटनेने स्पष्ट झाले. देवगिरी एक्स्प्रेस पोटूळ रेल्वेस्थानकात शिरण्याच्या पूर्वीच कपडा टाकून सिग्नल झाकण्यात आलेले होते. त्यामुळे रेल्वे थांबताच दरोडेखोरांनी दगडफेक सुरू केली.  एस-४ ते एस-९ पर्यंतच्या डब्यांवर तुफान दगडफेक सुरू झाल्याने प्रवाशांनी तातडीने खिडक्या आणि दरवाजे लावले. तरीही एका ४५ वर्षीय महिलेचे ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावून पळविण्यात आली. शिवाय अन्य प्रवाशांकडून मिळेल ते सामान घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला.

या घटनेत सुमारे २ लाख ५० हजारांचा ऐवज लुटण्यात आला आहे. या घटनेमुळे जवळपास अर्धा तास रेल्वे थांबली होती. घटनेच्या अनुषंगाने रेल्वेतील रेल्वे सुरक्षा बलाचे जवान व रेल्वे सेनेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने नियंत्रण कक्षाला माहिती दिली, त्यामुळे जवळच गस्तीवरील शिल्लेगाव पोलिसांचे पथक तातडीने सायरन वाजवत दाखल झाल्याने दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले.

Share