समांथा आणि विजय देवरकोंडाचा शूटिंगदरम्यान अपघात

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून समांथा रुथ प्रभू आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांना काश्मीरमध्ये ‘कुशी’ या चित्रपटाचे शूटिंग करताना अपघात झाला आहे. या अपघातात त्या दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समांथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा हे दोघेही सध्या ‘कुशी’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. समांथा आणि विजय हे काश्मीरमधील पहलगाम भागात
या चित्रपटातील एका स्टंट सीनचे शूटिंग करत होते. या दोन्ही कलाकारांना लिडर नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर बांधलेल्या दोरीवर एक स्टंट करायचा होता. हा स्टंट सुरू असताना ते दोघेही नदीतील खोल पाण्यात पडले. यावेळी त्या दोघांच्याही पाठीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्या दोघांनाही तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

या अपघातानंतर ते दोघेही रविवारी शूटिंगसाठी परतले. यावेळी त्यांना श्रीनगरच्या दाल सरोवरात शूटिंग करायचे होते; पण शूटिंगदरम्यान त्या दोघांनाही पाठदुखीचा त्रास होत होता. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यावेळी त्यांना तिथे एका फिजीओथेरपिस्टला बोलवण्यात आले. सध्या त्या दोघांची फिजिओथेरपी सुरू आहे.

https://www.instagram.com/p/Cdm1cXxIwEI/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, समांथा आणि विजय यांच्या ‘कुशी’ या चित्रपटाचे पोस्टर आणि टायटल ट्रॅक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. दिग्दर्शक शिव निर्वाण हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. समांथा आणि विजय यांच्याशिवाय मुरली शर्मा, जयराम, सचिन खेडाकर, सरन्या प्रदीप, वेनेला किशोर हे कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्स करत आहे. या बहुभाषिक चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन हेशम अब्दुल वहाब करत आहेत. येत्या २३ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Share