कुठं फेडाल ही पापं? वर गेल्यानंतर तुम्हाला नरकातच जावं लागेल! अजित पवारांनी सुनावले

सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि सडेतोड बोलण्याच्या पद्धतीसाठी परिचित आहेत. नुकतेच सातारा येथील शासकीय विश्रामगृहाच्या निकृष्ट बांधकामावरून त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलीच खरडपट्टी काढली. या विश्रामगृहात झालेल्या कामावरून अजित पवारांनी थेट स्टेजवरूनच या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. कुठं फेडाल ही पापं? वर गेल्यानंतर तुम्हाला तर नरकातच जावं लागेल, असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

काही दिवसांपूर्वीच बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक वास्तूचे जतन आणि संवर्धन करण्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती. आता साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बांधकामावरून त्यांनी पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना सुनावले आहे. शिवाय, नंतर थेट स्टेजवरूनच या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विश्रामगृहाच्या आत जाऊन पाहणी केली. तेव्हा सगळ्याच खोल्यांमध्ये बसवण्यात आलेले डबल बेड, भारंभार बसवण्यात आलेले लाईटचे स्पॉट अशा अनेक गोष्टींवरून त्यांनी आश्चर्यवजा नाराजी व्यक्त केली. एवढेच नाही, तर अजित पवारांनी चक्क स्वच्छतागृहातील फ्लश व्यवस्थित चालतात की नाही, याचीदेखील स्वत: खातरजमा केली. यानंतर सभेत बोलताना स्टेजवरूनच अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. “शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन झाले; पण मला काही ते आवडलेले नाही. नूतन शासकीय विश्रामगृह चेंबरी.. त्या चेंबरीचा पार चेचाच करून टाकला आहे”, असे अजित पवार म्हणाले.

यावेळी अधिकाऱ्यांना सूचक शब्दांत इशारा देताना पवार म्हणाले, “मी आता त्या बांधकामाची चौकशी लावणार आहे. मला अधिकाऱ्यांना सांगायचेय की, बाबांनो, तुम्हाला आम्ही दीड लाख कोटी रुपये पगार आणि निवृत्ती वेतन देतो. आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या टॅक्सचा तो पैसा असतो. ते करताना काहे तरी चांगली करत चला”.

“कुठं फेडाल ही पापं? वर गेल्यानंतर तुम्हाला तर नरकातच जावं लागेल. लोकांनी पण म्हटलं पाहिजे की खरंच त्या सरकारच्या काळात हे काम एक नंबर झालं. नाहीतर आम्ही मुंबईला आमच्या घरी पोहोचेपर्यंत इथे काहीतरी तुटलेलं असायचं. काय त्याला करायचंय? मग त्याबद्दल कारवाई नको का करायला? काही काही अधिकाऱ्यांना वाटत असतं की, हा सारखाच दम देत असतो. चांगलं काम केल्यानंतर तुमचं कौतुकही करेन ना”, अशा शब्दांत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

Share