संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

मुंबई : संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देणारे जगद्विख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे आज (१० मे) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते. अखेर आज मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी मनोरमा आणि मुलगा राहुल शर्मा आहेत.

संतूर वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे संतूरवादक अशी पंडित शिवकुमार यांची ओळख होती. भारतीय अभिजात संगीतात पं. शिवकुमार शर्मा यांचे योगदान अतुलनीय होते. संतूर या काश्मीरमधील लोकवाद्याला अभिजात संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या पंडित शिवकुमार यांनी भारतीय चित्रपट संगीतातही फार मोठी कामगिरी बजावली. ‘सिलसिला’ या चित्रपटाला बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बरोबर त्यांनी दिलेले संगीत रसिकांच्या सतत आठवणीत राहणारे ठरले आहे. हरिप्रसाद चौरसिया आणि शिवकुमार शर्मा यांची जोडी खूप गाजली. ही जोडी ‘शिव-हरी’ या नावाने ओळखली जायची. या जोडीने अनेक चित्रपटांना संगीत दिले. यश चोप्रा यांचा ‘सिलसिला’ (१९८०) हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर या जोडीने ‘फासले’ (१९८५), ‘चांदणी’ (१९८९), ‘लम्हे’ (१९९१), ‘डर’ (१९९३) या चित्रपटांना संगीत दिले. ९० च्‍या दशकात ‘चांदणी’ चित्रपटातील ‘मेरे हाथों में नौ-नौ चूडियां है’ हे अभिनेत्री श्रीदेवीवर चित्रीत करण्‍यात आलेले गाणे कमालीचे गाजले होते.

१९६७ मध्ये ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा अल्बम तुफान लोकप्रिय झाला होता. या अल्बममध्ये पं. शिवकुमार शर्मा यांनी पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काबरा यांच्याबरोबर वादन केले होते. शिवकुमार शर्मा हे उत्तम गायकही होते. त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९१ मध्ये पद्मश्री तर २००१ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. १९८५ मध्ये पंडित शिवकुमार शर्मा यांना बाल्टिमोर या संयुक्त राज्याचे मानद नागरिकत्वही प्रदान करण्यात आले होते. अभिनेत्री दुर्गा जसराज यांनी पंडित शिवकुमार शर्मा यांच्‍या निधनावर तीव्र दु:ख व्‍यक्‍त केले आहे. आज निसर्गातील संगीत शांत झाले. पंडित जसराज यांच्‍यापाठोपाठ पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधनाचे वृत्त हे मला अतीव दु:ख देणारे ठरले आहे, असे त्यांनी म्‍हटले आहे.

Share