पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राला संस्कृती शिकवण्याची गरज नाही. तुमची संस्कृती आणि संस्कार महाराष्ट्र शिकला तर राज्य आणखीन मातीत जाईल, असा टोला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.
दोन दिवसांपू्र्वी पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. या कार्यक्रमात राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांना मारहाण करण्यात आली. यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांवर हात उगारणाऱ्या भाजपची कानउघडणी केली आहे. गरज पडली तर, कोर्टात जाऊ आणि ऐकायला तयार नसतील अशा लोकांचे हात तोडून हातात देऊ, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि पवार घरण्यावर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात आमदार पडळकर यांनी एक ट्विट केले आहे. यात ते म्हणतात, शरद पवार यांनी महाराष्ट्राला संस्कृती शिकवण्याची गरज नाही. तुमची संस्कृती आणि संस्कार महाराष्ट्र शिकला तर राज्य आणखीन मातीत जाईल. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, संस्कार नाही, असे वक्तव्य खासदार सुळे यांनी केले आहे. त्यांनी काही वक्तव्यं केली की, ती माफ करायची. कारण त्या शरद पवारांच्या कन्या आहेत. मात्र, सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील महिलांच्या बाबतीत किती चुकीच्या वागत आहेत याचा प्रत्यय आला आहे.
ते म्हणाले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष एका मुलीचे शोषण करतो, त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. त्याला घेऊन तुम्ही विमानातून फिरता, मात्र यावर काही भाष्य करत नाही. पूजा चव्हाण हिने आत्महत्या केली की, तिची हत्या झाली यावर तु्म्ही ‘ब्र’ शब्द काढत नाही. राणा दाम्पत्याला १४ दिवस पोलिस कोठडीत टाकून त्यांच्यावर केस केली. तुमची भूमिका नेहमी दुटप्पी राहिली आहे. त्यामुळे पवार यांनी या महाराष्ट्राला संस्कार आणि संस्कृती शिकवण्याची गरज नाही. तुमची संस्कृती आणि संस्कार महाराष्ट्र शिकला तर तो आणखी मातीत जाईल.
जनतेला हे सर्व माहिती आहे. त्यामुळे खासदार सुळे यांनी सर्व महिलांच्या बाबतीत एकच भूमिका घेणे गरजेचे आहे. पुण्यात शिवसेनेच्या उपनेत्यांनी आणलेल्या विषयावर तुम्ही काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्या मुलीने वारंवार तिच्यावर अन्याय, अत्याचार झाला असल्याचे सांगितले. याउलट तुम्ही भाजपच्या चित्रा वाघ यांच्यावरच त्या मुलीला आरोप करायला लावले. त्यामुळे संस्कार शिकवण्याची गरज नाही. कारण जनता सर्व जाणून आहे, असेही आ. पडळकर यांनी म्हटले आहे.