मुंबई : समाजातील एकेका घटकाला टार्गेट करून आणि विविध समाज घटकांमध्ये विसंवाद निर्माण करून समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ‘टुकडे टुकडे गँग’ला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आवरावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना समाजातील विविध घटकांमध्ये भांडणे लावून समाजाचे तुकडे तुकडे करण्यातच रस आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची हिंदू पुरोहितांवरची टीका हे त्याचे ताजे उदाहरण आहे. मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केली. हिंदू समाजातील पुरोहितांची टिंगल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मुस्लिम अथवा अन्य धर्मियांच्या धर्मगुरुंची टिंगल करायची हिंमत होत नाही, हे आश्चर्यकारक आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार आस्तिक आहेत की, नास्तिक आहेत हे माहिती नाही; पण त्यांच्या पक्षाचे नेते आवर्जून हिंदू पुरोहितांची टिंगल करतात हे मात्र सर्वांना दिसते. अमोल मिटकरी व्यासपीठावरून पुरोहितांची टिंगल करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व त्या पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे हे जोरात हसून चिथावणी देत होते. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला एखाद्या समाज घटकाला असे लक्ष्य करणे शोभत नाही; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा पुरोगामीपणा केवळ सांगण्यापुरताच आहे. या पक्षाच्या नेत्यांना केवळ विविध समाजघटकांमध्ये भांडणे लावून समाजाचे तुकडे करण्यात रस आहे असे दिसते, अशी टीका चंद्रकांतदादांनी यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसला हिंदू पुरोहितच नाही तर अन्य समाजघटकांबद्दलही आस्था नाही. महाराष्ट्रात १९९९ ते २०१४ अशी १५ वर्षे सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही आणि २०१९ मध्ये मतदारांचा विश्वासघात करून सत्ता मिळविल्यानंतर त्यांनी मराठा समाजाचे असलेले आरक्षण घालविले. याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या बेफिकीरीमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. दलित व आदिवासींच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा घोळही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीनेच केला. पुरोगामीत्वाचा आव आणायचा आणि प्रत्यक्षात विविध सामाजिक वर्गांतील दुर्बल घटकांना लक्ष्य करून आपली मग्रुरी दाखवायची ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पद्धती ताज्या घटनेत दिसली आहे, असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला.