मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने नेमलेल्या कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. हिंसाचाराच्या घटनाक्रमाबद्दल माझ्याकडे व्यक्तिगत माहिती नाही. तसेच त्यासंदर्भात राजकीय विचारसरणीबाबतही माझा आरोप नाही, असे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या या भूमिकेनंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पवार यांच्यावर निशाणा साधत पवारांचे राजकारण खोटेपणावर आधारित असल्याचा आरोप केला आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या हिंसाचारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर अनेक गंभीर आरोप केले होते. आता पवारांनी सरकारने नेमलेल्या कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर जे अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, त्यातून पवारांचा खोटेपणा समोर आला आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीटमध्ये केली आहे.
केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, ‘कोरेगाव-भीमा दंगलीच्या निमित्तानं शरद पवारांनी भाजपाला बदनाम करण्यासाठी खोटं बोलत तत्कालीन राज्य सरकारनं पोलिसांच्या मदतीने घडवलेले षडयंत्र होते, असा आरोप केला होता. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही त्यांनी पत्र लिहिलं होतं. पोलिसांनी मूळ पुरावे नष्ट करून अनेक खोटे पुरावे तयार केल्याचा दावाही केला; परंतु आता या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर पवारांनी आपल्याकडे काहीही माहिती उपलब्ध नाही. कुठल्याही राजकीय पक्षावर आरोप करायचा नाही, असं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्याने केवळ राजकारणासाठी खोटेपणाचा वापर करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावं आणि पत्रकार परिषद घेत सातत्याने भाजपाला बदनाम करावं हे दुर्दैवी म्हणावे लागेल,’ अशा शब्दांत उपाध्ये यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
ज्यांचे संपूर्ण राजकारणच खोटेपणावर अवलंबून आहे, त्या शरद पवारांकडून दुसरी अपेक्षा करणार तरी कशी? असा खोचक सवालही केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.