रिया चक्रवर्तीच्या अडचणी पुन्हा वाढल्या; ‘एनसीबी’ कडून खटला दाखल

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर ड्रग्स प्रकरणाचा तपास मागील दोन वर्षांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) करत आहे. सुशांतसिंह राजपूत च्या मृत्यूच्या जवळपास दोन वर्षांनंतर ‘एनसीबी’ ने बुधवारी सुशांतसिंह राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा मोठा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि अन्य काहींच्या विरोधात मुख्य आरोपी म्हणून न्यायालयात खटला दाखल केला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर ड्रग्स प्रकरणाचा तपास ‘एनसीबी’ ने केला. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर ‘एनसीबी’ ने सुशांतसिंह राजपूत याच्यासाठी ड्रग्स विकत घेणे आणि त्याला ते पुरवल्याबद्दल सुशांतसिंह राजपूतची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविकसह अन्य काही आरोपींच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविकसह इतर काहीजणांना मुख्य आरोपी ठरवले आहे.

विशेष सरकारी वकील अतुल सरपंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व आरोपींवर चार्जशीटवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यांनी ही ड्राफ्ट चार्जशीट दाखल करून घेताना सांगितले की, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांनी ड्रग्सचा वापर केला होता आणि सुशांतसिंह राजपूतसाठी त्यांनी या ड्रग्सची खरेदी केली होती. याशिवाय न्यायालयाकडून सर्व आरोपींवर आरोप निश्चित केले जाणार होते. मात्र, काही आरोपींनी दोषमुक्तीचे अर्ज दाखल केल्याने तसे होऊ शकले नाही, असे सरपंदे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जोपर्यंत दोषमुक्तीच्या अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत काही आरोपींवरील आरोप निश्चित करता येणार नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीसाठी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती हे न्यायालयात हजर होते. विशेष न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांच्यासमोर आता १२ जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

सिने अभिनेता सुशांतसिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी मुंबईतील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणाला आता दोन वर्षे झाली आहेत. मात्र, या प्रकरणाचा अद्याप एनसीबीकडून तपास सुरू आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर तपासात समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीला सप्टेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. जवळपास एक महिना तुरुंगात राहिल्यानंतर रियाचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला होता.

Share