राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली आहे. आदिवासी समाजातील शिवसैनिकांनी विनंती केल्यानंतर आपण एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना कुणाल पाठिंबा देणार, याविषयी सगळीकडे चर्चा सुरु होत्या. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी खासदारांचा उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव असल्याच्या बातम्या येत होत्या. पण मी नम्रपणे सांगू इच्छितो की राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना खासदारांनी माझ्यावर कोणताही दबाव आणला नाही. मला आदिवासी समाजातील अनेक कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे फोन आले. विशेष करुन शिवसेनेतील आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांनी, शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी पाठिंब्यासाठी मला विनंती केली. प्रेमाच्या आग्रहाखातर अखेर आम्ही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यचाा निर्णय घेतला आहे.

Share