रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा; शिवप्रेमींची अलोट गर्दी

रायगड : तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा सोमवारी (६ जून) किल्ले रायगडावर मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. ढोल-ताशा आणि तुतारीच्या गजरात, तलवारी आणि भगवे झेंडे नाचवत शिवप्रेमींनी छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक साजरा करण्यासाठी लाखोच्या संख्येने शिवप्रेमींनी हजेरी लावली होती कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यावर्षी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. कोणतेही निर्बंध नसल्याने रायगडावर शिवभक्तांचा जणू सागरच उसळला होता. छत्रपती घराण्याचे वंशज असलेले संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत आज ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघा रागयड परिसर दुमदुमला. सोहळा पाहण्यासाठी रायगडावर शिवप्रेमींची अलोट गर्दी झाली होती. यंदा ‘शिवराय मनामनात-शिवराज्याभिषेक घराघरांत’या संकल्पनेनुसार रायगडावर हा सोहळा साजरा करण्यात आला.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती यांच्या सूचनेनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी करण्यात आली होती. आज शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान संभाजीराजे छत्रपती काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, मी राज सदरेवर राजकीय भाष्य करणार नाही, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले.  छत्रपती शिवरायांनी ‘स्वराज्य’ स्थापनेचा निर्णय घेतला, तेव्हा मुठभर मावळे सोबतीला होते;पण महाराजांचा निश्चय, काम करण्याच्या पध्दतीमुळे लोकसंचय वाढला आणि शिवाजी महाराजांच्या अखंड ध्यासामुळे सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे ‘स्वराज्य’ उदयास आले आणि महाराज छत्रपती झाले, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थितांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आधी ध्वजपूजन, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करून राज्याभिषेक सोहळा पार पडला.

किल्ले रायगडावर आकर्षक रोषणाई


शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे सायंकाळी अंधार पडताच किल्ले रायगड या रोषणाईने उजळून निघाला. रायगडावर पाच ते सहा लाख शिवभक्तांचे अन्नछत्र उभारण्यासह राजसदर फुलांनी सजविण्यात आले होते. भवानी पेठ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर आणि शिवसमाधी विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते.

Share