धक्कादायक ! नाशिकमध्ये बंद गाळ्यात आढळले मानवी अवयव

नाशिक- नाशिकमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या गाळ्यात मानवी अवयव सापडल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रात्री मुंबई नाका पोलीस ठाण्याच्याच पाठीमागील सोसायटीमध्ये हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, हे अवयव वेगवेगळे असून वैद्यकीय शिक्षणासाठी मानवी अवयव संकलन करतात, त्याच पद्धतीने ते संकलित व साठवणूक केल्याचे आढळून आले आहे.

मुंबई नाका पोलीस स्टेशनलगत असलेल्या हरी विहार बिल्डिंगच्या बंद पडलेल्या गाळ्यामध्ये हे अवयव सापडले असून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये किंवा मृतदेह परीक्षणासाठीच्या प्रयोगशाळेत ठेवल्या जाणाऱ्या अवस्थेत आढळले आहेत. या गाळ्यांत वेगवेगळ्या बादल्यांमध्ये केमिकल परीक्षण व प्रक्रिया करून ठेवलेले मानवी डोकं, हात, कान व अन्य शारिरीक अवयव सापडले आहेत.

दरम्यान, गाळे मालकाने हे गाळे पंधरा वर्षांपासून उघडलेलेच नाहीत. ते बंदच होते. याबद्दल मला काहीच माहित नाही. अशी माहिती पोलिसांना दिली आहे. हरी विहार सोसायटी मध्ये काही गाड्यांचे बॅटरी चोरीला गेल्यावर सोसायटीचे चेरमान चोरीला गेलेल्या बॅटरींचा शोध घेत असताना त्यांना सोसायटीच्या परिसरातील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या गाळ्याच्या आत हे अवयव आढळून आले. त्यांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली आणि हा सगळा प्रकार समोर आला.

Share