अखेर रणबीर कपूर-आलिया भट्ट लग्नबंधनात अडकले

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले चित्रपट अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचे लग्न आज थाटामाटात पार पडले. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अखेर गुरुवारी (दि. १४ एप्रिल) रणबीर आणि आलिया विवाह बंधनात अडकले. मुंबईतील पाली हिलस्थित रणबीरच्या ‘वास्तू’ अपार्टमेंटमध्ये या जोडप्याने सात फेरे घेत नव्या प्रवासाची सुरुवात केली.

दरम्यान, हा लग्नसोहळा अतिशय खासगी स्वरुपात पार पडला. लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि खास निमंत्रित मित्रमंडळी उपस्थित होती. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. कोरोनामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते; पण अखेर आज बैसाखीच्या मुहूर्तावर दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. पंजाबी रितीरिवाजांनुसार त्यांचा विवाह पार पडला.

रणबीर-आलियाच्या लग्नसोहळ्यात रणबीरची आई नीतू कपूर, बहीण रिद्धिमा कपूर, रणबीरचे काका रणधीर कपूर आणि काकू बबिता कपूर, शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर, करण कपूर, रिमा जैन, करीना कपूर, करिश्मा कपूर, सैफ अली खान, अरमान कपूर, आलियाचे वडील दिग्दर्शक महेश भट्ट, आई सोनी राजदान, आलियाची बहीण शाहीन, मुकेश भट्ट, अयान मुखर्जी, करण जोहर, आकांक्षा कपूर, अनुष्का कपूर, आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी, नंदा यांच्यासह अनेक सेलिब्रटींनी हजेरी लावली होती. हा लग्न सोहळा जेथे पार पडला त्या ‘वास्तू’ बंगल्याबाहेर रणबीर-आलियाच्या चाहत्यांनीही मोठी गर्दी केली होती. आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यासाठी कडक सुरक्षा करण्यात आली होती. खास पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, आलिया आणि रणबीरचा ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लग्नानंतर लगेचच दोघेही आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत, तर हनिमूनला स्वित्झर्लंडला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Share