मराठा क्रांती मोर्चाचे मंत्रालयात ठिय्या आंदोलन

मुंबई : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण केले होते. त्यावेळी राज्य सरकारने या सर्व मागण्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्या अद्यापही पूर्ण केल्या नसल्याचा आरोप करून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व विद्यार्थ्यांनी मंत्रालयात आंदोलन सुरू केले आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या दालनात मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी ठिय्या दिला आहे. जोपर्यंत आम्हाला भेटण्यासाठी मुख्यमंत्री येणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले आहे. मराठा समाजाच्या एकूण १४ मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केले होते. या मागण्या राज्य सरकारने मान्य करून खासदार संभाजीराजे छत्रपती यांना लेखी आश्वासन देत उपोषण सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर सुमारे दीड महिन्यानंतरही सरकारने दिलेले आश्वासन पाळलेले नाही, मागण्या मान्य होऊनही त्याची दिलेल्या वेळेत पूर्तता झालेली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.

मराठा समाजाचे प्रश्न अद्याप न सुटल्याने मराठा तरुण आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश अधिकाऱ्यांकडून धुडकावले जात असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. आमचे विद्यार्थी मेल्यानंतर मुख्यमंत्री येणार आहेत का? मुख्यमंत्री जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत मंत्रालयातून उठणार नसल्याचे आंदोलक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

मागण्या अद्यापही प्रलंबित
‘सारथी’मधील रिक्त पदे भरणे, ‘सारथी’च्या आठ उपकेंद्रांसाठी जमीन देणार, मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना एसटी महामंडळात नोकरी, मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास  महामंडळाला निधी आणि संचालक मंडळ नियुक्ती, कोपर्डी खटल्यातील आरोपींना तत्काळ कठोर शिक्षा करणे, पंजाबराव देशमुख वस्तीगृह ‘सारथी’शी संलग्न करणे, मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आश्वासन सरकारने दिले होते. तसेच प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांचे गुढी पाडव्याला उद्घाटन होणार होते;पण अद्याप या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. सुमंत भांगे हे मागण्या पूर्ण करण्यासाठी समन्वय अधिकारी होते. या मागण्यांचा आढावा घेण्यासाठी मराठा मोर्चाचे समन्वय विद्यार्थी मंत्रालयात आले होते;पण संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांना योग्य प्रतिसाद न मिळाल्याने हे आंदोलक अधिकाऱ्यांच्या दालनातच ठिय्या आंदोलनाला बसले आहेत.

सरकारकडून आमची फसवणूक केली जातेय  
राज्य सरकारने ‘सारथी’चा प्रश्न अजूनही प्रलंबित ठेवल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. तसेच २०१४ आणि २०१९ मधील मराठा आरक्षणाच्या नियुक्त्या कधी देणार? असा सवाल करीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण सोडवण्यास आलेल्या मंत्र्यांनी अद्याप मागण्यांची पूर्तता का झाली नाही, याचे उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागितली होती. त्यांचे वंशज संभाजीराजे छत्रपती आझाद मैदानात उपोषणाला बसले होते. उपोषण सोडताना सरकारच्या वतीने प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला गेला होता. मात्र, अजूनही प्रश्न सुटले नसल्याने आम्ही आज मंत्रालयात आंदोलन करत आहोत, असे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी म्हटले आहे. १५ मार्चला आम्ही आलो होतो, त्यानंतर आम्ही तीन वेळा आलो. मात्र, आमची फसवणूक केली जात आहे, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.

आमचे विद्यार्थी मेल्यानंतर मुख्यमंत्री येणार आहेत का?
दरम्यान, ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे ते अंकुश कदम म्हणाले, सरकारचे काही जातीयवादी अधिकारी मराठा समाजाचा घात करण्याच काम जाणीवपूर्वक करत आहेत. आज गरज नसताना या अधिकाऱ्यांनी तोंडी मत मागवले असून, हे अधिकारी आमच्या मागण्या धुडकावत आहेत. जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर ते आत्महत्या करण्यास हे अधिकारी भाग पाडत आहेत. ‘झुकेंगा नही’ म्हणणाऱ्या म्हातारीला भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ असतो; पण आमचे विद्यार्थी मेल्यानंतर मुख्यमंत्री येणार आहेत का? जोपर्यंत मुख्यमंत्री आम्हाला भेटायला येत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही.

Share