सोमय्यांचा ‘टॉयलेट घोटाळा’ लवकरच बाहेर काढणार : संजय राऊत

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कुटुंबीयांकडून चालवण्यात येणाऱ्या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि अन्य ठिकाणी जवळपास १०० कोटी रुपयांचा ‘टॉयलेट घोटाळा’ करण्यात आल्याचा आरोप करून आपण लवकरच हा घोटाळा कागदपत्रांसह बाहेर काढणार असल्याचा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला.

आज शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना खा. राऊत म्हणाले, किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या या युवा प्रतिष्ठानचा कारभार पाहतात. त्यांनी हा घोटाळा केला आहे. या घोटाळ्याचे पुरावे आणि अहवाल कुठे आहे, हे सोमय्या कुटुंबीयांनाही माहिती आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टीला छिद्र पडलेय का? असा सवाल किरीट सोमय्यांना उच्च न्यायालयाने दिलेल्या अटकपूर्व जामिनावर बोलताना खा. संजय राऊतांनी विचारला आहे. तसेच ‘आयएनएस विक्रांत’ साठी जमा केलेल्या प्रश्नांचा हिशोब द्या, असे म्हणत पुन्हा एकदा राऊतांनी सोमय्यांवर निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या हे ‘आयएनएस विक्रांत’ निधी घोटाळ्यातील आरोपी आहेत. उद्या दाऊद इब्राहिम पाकिस्तानात बसून दहशतवादाविरोधात बोलायला लागला तर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार आहे का? तशीच गत किरीट सोमय्या यांची झाली आहे. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर आता कोणी विश्वास ठेवणार नाही. विक्रांत युद्धनौकेसाठी गोळा केलेला पैसा कुठे गेला, याचे उत्तर सर्वप्रथम किरीट सोमय्या यांनी द्यावे, अशी मागणी खा. राऊत यांनी केली.

किरीट सोमय्या यांचा महाराष्ट्रात दुर्गंध पसरवणारा घोटाळा लवकरच बाहेर येईल. सोमय्या यांनी ‘आयएनएस विक्रांत’पासून टॉयलेट घोटाळ्यात पैसे खाल्ले आहेत. १०० कोटींच्या टॉयलेट घोटाळ्यात युवा प्रतिष्ठानकडून खोटी बिले तयार करून पैसे लाटण्यात आले. आगामी काळात आम्ही किरीट सोमय्या यांचे आणखी काही घोटाळे बाहेर काढणार आहोत. त्यामुळे त्यांना आता खुलासेच बसत द्यावे लागेल, असे खा. राऊत यांनी सांगितले.
भ्रष्टाचाराविषयी कणव असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी ‘आयएनएस विक्रांत’ घोटाळ्यावर काहीतरी बोलले पाहिजे. एरवी फडणवीस आणि भाजप नेत्यांची राष्ट्रभक्ती उचंबळून येत असते. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना १४ ट्विटस केली. त्यांनी एखादे ट्विट ‘आयएनस विक्रांत’ घोटाळ्याबाबतही करायला हवे होते, असा टोला खा. राऊत यांनी लगावला.

Share