एसटी बस २० फूट खोल दरीत कोसळली; १५ प्रवासी गंभीर जखमी

पालघर : भुसावळहून बोईसरकडे निघालेली एस. टी. बस पालघर येथील वाघोबा घाटात २० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसमधील १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. आज शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, एस. टी. बसचालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटून बस थेट २० फूट खोल दरीत जाऊन कोसळली आणि हा अपघात घडला, असे प्रवाशांनी सांगितले.

एसटीची भुसावळ ते बोईसर ही रातराणी बस नाशिकहून पालघरला येत होती. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वाघोबा घाटात एका वळणावर बसचालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस २० फूट दरीत कोसळली. त्यामुळे बसमधील १५ प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस, महसूल, आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढत पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी करण्यात दाखल करण्यात आले आहे. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

या बसचा चालक नाशिक येथे बदलण्यात आला होता. हा अपघात घडला तेव्हा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. बसचालक दारू पिऊन सुसाट वेगात बस चालवत असल्याने प्रवाशांनी यावर आक्षेप घेतला होता. त्यांनी बसच्या कंडक्टरकडे तक्रारही केली होती. मात्र, कंडक्टरने त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याची परिणीती भीषण अपघातात झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढत पालघरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Share