कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई -जिल्हाधिकारी

औरंगाबाद : जिल्ह्यासह राज्यभरात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरणासह कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी कोविड१९ ओमायक्राॅन व्हेरीयंट संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनुरूप मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आले आहेत. या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, विवाह समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय मेळावे यांमध्ये ५० लोकांची उपस्थितीची मर्यादा आहे. यावर यंत्रणांनी काटेकोर लक्ष ठेवावे. शॉपिंग मॉल्स, बाजार संकुले, यामध्ये एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेसर सुरू ठेवण्यास मुभा आहे. तसेच मॉल्सची एकूण क्षमता आणि प्रवेश दिलेल्या ग्राहकांची संख्या याबाबत प्रवेश व्दाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्पष्ट दिसेल अशा ठळक पद्धतीने लावण्यात यावी. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मालांचा लिलाव दिवसातून वेगवेगळ्या वेळा घेता येईल का याबाबत विचार करण्यात यावा.

शहरातील प्रसिध्द हाॅटेल सील-
औरंगाबाद शहरातील प्रसिध्द भोज हाॅटेल सील करण्यात आले आहे.या हॉटेलमध्ये क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहक आढळले होते. येथे क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक भोजन करत होते. तसेच येथे कोरोना प्रतिबंधक नियम पायदळी तुडवण्यात आले होते. मास्क न लावता कर्मचारी खाद्यपदार्थ तसेच स्वयंपाक तयार करत होते. या सर्व बाबी समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या हॉटेलला थेट सील करण्याचे आदेश दिले.

Share