केंद्रातील बड्या नेत्यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : राज्यातील मंत्र्यांपाठोपाठ आता केंद्रीय मंत्री मंडळात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट हे देखील कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. स्वत: अजय भट्ट यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन अजय भट्ट यांनी केलं आहे. ते सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. काही दिवसांपुर्वी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यादेखील कोरोना पाॅझिटिव्ह झाल्याचं समोर आलं होतं.

 

राजनाथ सिंह यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. मी स्वत:ला होम क्वारंटीन केले आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी.असे ट्वीट राजनाथ सिंह यांनी केले आहे. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी ६ जानेवारी रोजी उत्तराखंड येथे एक निवडणूक रॅली केली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.

 

दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर होम आयसोलेशनवर आहेत. मुख्यमंत्री कार्यलयाकडून सोमवारी सायंकाळी ट्विट करून ही माहिती देण्यात आली.

Share