मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज (२० जून) सकाळी मुंबईतील लीलावती रुग्णालयात हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून, राज ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मागील काही काळापासून हिप बोन या आजाराने त्रस्त आहेत. गेल्या महिन्यात २२ मे रोजी पुण्यात झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, कोरोनाची लागण झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच्या चाचण्या करण्यासाठी राज ठाकरे यांना शनिवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज सकाळी लीलावती रुग्णालयात राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

मध्यंतरी टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. पायाचे दुखणे वाढल्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार राज ठाकरे यांच्यावर आज हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास दीड तास ही शस्त्रक्रिया चालली. ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली. राज ठाकरे यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना साधारण दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी सांगितले की, ”मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज सकाळी लीलावती रुग्णालयात यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली. लीलावती रुग्णालयातील ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली.”

राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून काल मुंबईत महाआरती आणि पूजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मनसेच्या महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनेतर्फे गणेश मंदिर आणि हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरील हिप बोनची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मात्र, अजून काही दिवस राज ठाकरे यांना आराम करावा लागणार आहे. ज्यांनी ज्यांनी राज ठाकरे यांच्यासाठी दुआ, प्रार्थना, होम हवन, अभिषेक केला त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

Share