संजय राऊतांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये आग लावली : आ. नितेश राणे यांचा गंभीर आरोप

कोल्हापूर : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. ‘संजय राऊतांचा घर फोडण्याचा इतिहास आहे, त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भांडणं लावली; पण आता राऊतांची मजल थेट छत्रपतींचं घर फोडण्यापर्यंत गेली’ अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारीला शिवसेनेने पाठिंबा नाकारल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच रविवारी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. त्यानंतर राऊत यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवर निशाणा साधला. या साऱ्या घटनाक्रमावर कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले. यावेळी त्यांना संजय राऊतांनी केलेल्या कोल्हापूर दौऱ्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, त्यावर उत्तर देताना नितेश राणेंनी संजय राऊत आता छत्रपतींच्या घरामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये आग लावण्याचे काम करणाऱ्या लोकांमध्ये संजय राऊतही होते, असे म्हणत नितेश राणेंनी राऊतांवर निशाणा साधला.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भांडणं लावण्यामध्ये ज्या लोकांचा हात होता, त्यामध्ये राऊतांचाही समावेश आहे. संजय राऊतांचा घर फोडण्याचा इतिहास आहे. राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा राऊतांची गाडी फोडण्यात आली होती. त्यावेळी असे का झाले? कारण राऊतांनीच दोन्ही भावांमध्ये भांडणं लावली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी असंख्य वेळा याचा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये केला की, आमच्या घरामध्ये आग लावली जात आहे, असे नितेश राणे म्हणाले. संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत नितेश राणे म्हणाले, अशा लोकांना सुरक्षारक्षकांची गरज नाही. हा काल ठाकरेंच्या घरात आग लावत होता आज छत्रपतींच्या घरापर्यंत पोहचण्याची याची मजल गेलीय. म्हणून कधीतरी त्यांच्या आजूबाजूच्या बॉडीगार्डला १० मिनिते सुट्टी दिली पाहिजे किंवा सुट्टीवर पाठवा. अशा लोकांना अंगरक्षकांची गरज नाही. थोडा मराठा समाजाने त्याचा ताबा घेतला पाहिजे, असे माझे म्हणणे आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या घरी त्याने आग लावली आज छत्रपतींच्या घरी आग लावलेली आहे. हा जो आग लावण्याचा इतिहास आहे. ही आग लावण्याची हिंमत संजय राऊत करतोय हे कधी ना कधीतरी त्याला मोजायला लागणार हे मी तुम्हाला नक्की सांगतो, असेही राणे यांनी म्हटले.

नितेश राणे यांचा राऊतांवर टीका करताना तोल सुटल्याचे यावेळी पहायला मिळाले. नितेश यांनी संजय राऊतांची तुलना शाहू महाराजांच्या श्वानाशी केली. ते म्हणाले, शाहू महाराजांचे मी खरेच कौतुक करीन की, त्यांनी अतिशय योग्य जागी त्यांनी संजय राऊतांना बसवले. कसंय एका बाजूला त्यांचा कुत्रा बसलेला अन् दुसऱ्या बाजूला संजय राऊत बसलेला. बरोबर जागी त्यांना ते स्थान बरोबर दिलं. एक त्याचा पालतू होता. दुसरा कोणाचा पालतू आहे उभ्या महाराष्ट्राला माहितीय. कोणाच्या बिस्कीटावर नाचतो तो. म्हणून त्यांनी बरोबर स्थान दिलं त्याला, असे नितेश राणे राऊत यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले.

शब्द फिरवणारा त्याला उद्धव ठाकरे म्हणतात

देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला असता तर संभाजीराजेंना नक्कीच त्यांनी निवडून आणले असते. संभाजीराजेंना जो मानसन्मान भाजपने दिला, देवेंद्र फडणवीसांनी दिला, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला, अमित शाहांनी दिला. कधी संभाजीराजेंना विचारा, त्यांच्या सहा वर्षाच्या खासदारकीमध्ये त्यांना काय मानसन्मान दिलाय. उद्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांना शब्द दिला असता की, चला तुम्हाला खासदारकी देतो किंवा तुम्हाला अपक्ष म्हणून निवडून आणतो. १०१ टक्का निवडून आणलं असतं. त्याला देवेंद्र फडणवीस म्हणतात, उद्धव ठाकरे म्हणत नाही. शब्द फिरवणारा त्याला उद्धव ठाकरे म्हणतात, अशी टीका नितेश राणेंनी केली.

नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवणे हे काय नवीन नाही. ज्याला शिवसेनेचा इतिहास माहिती आहे त्या कुणालाही विचारा, राणेंना विचारा, राज ठाकरेंना विचारा, ज्यांनी जुनी शिवसेना पाहिलेली आहे. प्रत्येकजण बोलेल की, हा माणूस असाच आहे. शब्द फिरवण्यात आणि खोटं बोलण्याचा उद्धव ठाकरेंचा इतिहासच आहे. नवीन काय आहे त्यामध्ये? तो माणूस असाच आहे. आज महाराष्ट्राला त्याची ओळख होते. संभाजीराजेंनी त्याच्यावर विश्वास करण्याआधी दोनदा विचार करायला हवा होता. उद्धव ठाकरे म्हणजे देवेंद्र फडणवीस नाहीत, असेही नितेश राणे म्हणाले.

Share