डेहराडून : उत्तराखंडमध्ये टिहरी जिल्ह्यात उत्तरकाशीतील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या बोलेरो गाडीला भीषण अपघात घडला. या अपघातात चालकासह तिघे जागीच ठार झाले, तर दहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे
ओझरी ते सायना चाटीदरम्यान डाबरकोटजवळ ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये मुंबईतील अंधेरी पूर्वमध्ये राहणारे पूरन नाथ, भंडारा येथील जयश्री अनिल कोसरे आणि नागपूरच्या अशोक महादेव राव यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील १२ प्रवाशांना घेऊन बोलेरो गाडीचालक गुरुवारी रात्री उशिरा जानकीछत्ती येथून बरकोटकडे चालली होती. यमुनोत्री धामपासून २८ कि. मी. अंतरावर असलेल्या ओझरीजवळ बसला साईड देताना बोलेरो गाडीला अपघात झाला. बोलेरो गाडीचालकाने बसला साईड देण्यासाठी बोलेरो बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो गाडी थेट खोल दरीत कोसळली. बोलेरो गाडीत ९ व्यक्तींसह ४ लहान मुले प्रवास करत होती. यातील दोन पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी रस्ता अरुंद असून सुरक्षा व्यवस्था नव्हती. या अपघातानंतर पोलिस आणि राज्य आपत्ती दलाच्या पथकाने शोध आणि बचाव कार्य हाती घेतले. चार लहान मुलांसह दहा जखमी प्रवाशांना खोल दरीतून बाहेर काढण्यात त्यांना यश आले आहे. जखमींमध्ये चार मुलांचा समावेश आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी शालिनी नेगी यांनी दिली.