ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ काळातील गुन्हे मागे घेणार- गृहमंत्री

मुंबई : कोरोना संक्रमण काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यात कलम १८८ लागू करण्यात आला होता. यानुसार संचारबंदीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर आणि विद्यार्थ्यांवर गृह विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते . या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय गृह विभागाने तत्त्वतः घेतला असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना दिली.

या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येईल. त्याद्वारे विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यावर विचार केला जाईल, जेणेकरून त्यांना भविष्यात वा परदेशी शिक्षणासाठी जाताना अडचणींचा सामना करावा लागू नये, हा आमचा प्रयत्न राहील, असे गृहमंत्री म्हणाले.

तसेच राजकीय किंवा बैलगाडा शर्यतीसंबंधी गुन्हे असतील तर ते मागे घेण्यासंबंधी निर्णय झाला आहे. प्रक्रियेप्रमाणे सर्व जिल्हा प्रमुखांकडून शासनाकडे निर्णय येईल त्यानंतर सरकार निर्णय घेईल आणि नंतर कोर्टात जाऊन गुन्हे मागे घेतले जातील,”असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

Share