उद्घाटनापूर्वीच समृद्धी महामार्गवरील पूल कोसळला

समृद्धी महामार्गाचे उद्घाटन २ मे ला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होत पण उद्घाटनापूर्वीच या मार्गावरील निर्माणाधीन पुलाचा मोठा भाग कोसळल्याची घटना बुलडाण्याच्या सिंदखेडराजा जवळ घडली आहे. सुरक्षा रक्षकाने प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार रात्री 1-2 वाजेदरम्यान ही घटना घडली आहे. बांधकाम सुरू असताना एक मोठा गर्डर 80 फुटावरून खाली कोसळला. काम सुरू असताना पुलाचे निर्माण करणारे मजूर बाजूला गेल्यानंतर ही घटना घडली. त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोसळलेल्या पुलाखाली एक ट्रक देखील दबला आहे. लोकार्पणाच्या घाईमध्ये निकृष्ट दर्जाचे काम होत आहे असा आरोप करण्यात येत आहे. आठवड्याभरात समृद्धी महामार्गाशी निगडीत दुसरी दुर्घटना आहे.

समृध्दी महामार्गाच्या उद्धाटनाचा मुहूर्त ठरला होता. पण आता लोकार्पण पुढे ढकलण्यात आले आहे.पहिल्या टप्प्यात वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार ते नागपूर असा 240 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मात्र महामार्गाचे लोकार्पण लांबणीवर पडले असल्याचे माहिती शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

​​​​​​नागपूरपासून 15 किमी अंतरावर वन्यजीवांसाठी पासिंग रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, त्यात काही चुका असल्याने रस्त्यात काही दुरुस्त्या करण्यात येणार आहे. हे काम दीड महिन्याच्या कालावधीत पूर्ण होईल. वन्यजीव उन्नत मार्ग पूर्ण झाल्याशिवाय महामार्ग वाहतुकीसाठी सुरू करता येणार नाही. यामुळे लवकरच मार्गाचे लोकार्पणाच्या नवी तारीख कळवण्यात येईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Share