मंत्र्यांची दादागिरी सहन करणार नाही; शिवसेना आमदार आशिष जयस्वाल यांचा इशारा

मुंबई : राज्यात सत्तेत असलेल्या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या सरकारवर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सातत्याने टीका केली जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील मतभेद व नाराजी वेळोवेळी समोर आलेली असताना आता तसाच एक प्रकार समोर आला आहे. चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाच्या अर्थात शिवसेनेच्या एका आमदाराने थेट मंत्र्यांनाच आव्हान दिले आहे. मंत्र्यांकडून निधीवाटपामध्ये भेदभाव केला जात असून तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराच या आमदारांनी दिला आहे.

सत्ताधारी शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांनी महाविकास आघाडी सरकारमधील आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सरकारी निधीवाटपात भेदभाव होत असल्याची तक्रार सर्वपक्षीय आमदारांकडून केली जात असल्याचा दावा आशिष जयस्वाल यांनी केला आहे. ही माझी एकट्याची नाही, तर सर्वपक्षीय आमदारांची ही तक्रार आहे. काँग्रेसच्या आमदारांचीही नाराजी आहे. त्यांनीदेखील तक्रारपत्रावर सही केली आहे. आदिवासी जनतेवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. त्या भागातील जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही तक्रार केली आहे. सर्व मतदारसंघातील आमदारांना सारखा न्याय दिला पाहिजे. काही भागातल्या आमदारांना झुकते माप दिले जात असेल आणि काही आमदारांवर अन्याय होत असेल तर आम्ही तो सहन करणार नाही, असा इशारा आ. आशिष जयस्वाल यांनी दिला आहे.

इतरांच्या म्हणण्यानुसार कामे कशी होतात?

जेव्हा विधिमंडळात सर्व आमदारांच्या पाठिंब्याने अर्थसंकल्प मंजूर होतो, तेव्हा त्या आमदारांना नियमानुसार निधी देणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडेही राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदारांनी तक्रार केली आहे. ज्या आमदारांनी अर्थसंकल्प मंजूर केले, त्या आमदारांच्या मतदारसंघात इतरांच्या म्हणण्यानुसार कामे कशी दिली जातात? असा सवाल आ. जयस्वाल यांनी केला आहे.

मी ‘त्या’ सर्व मंत्र्यांची पोलखोल करणार

यावेळी आ. आशिष जयस्वाल यांनी आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्यावर आरोप केला आहे. के. सी. पाडवी यांच्यावर माझा थेट आरोप आहे की, त्यांनी निधीवाटपात अन्याय केला आहे. हा अन्याय आम्ही अजिबात सहन करणार नाही. आम्ही सर्वपक्षीय आमदार लढा देऊ. कोणत्याही आर्थिक गैरव्यवहारातून जर निधी वितरीत करण्यात आला तर आम्हाला हे अजिबात मान्य नाही. मी त्या सर्व मंत्र्यांची पोलखोल करणार आहे. सर्व आमदार मिळून आम्ही लढा देऊ. कोणत्याही परिस्थितीत मंत्र्यांची दादागिरी आम्ही सहन करणार नाही, असे आ. जयस्वाल म्हणाले.

Share