जगात सर्वात स्वस्त पेट्रोल व्हेनेझुएलामध्ये; एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागतात फक्त १ रुपये ७० पैसे!

नवी दिल्ली : एकीकडे भारतात इंधनाच्या दरांनी उच्चांक गाठलेला असतानाच दुसरीकडे जगात एक असा देश आहे जिथे १.७ रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल विकले जात आहे. काय ऐकून धक्का बसला की नाही; पण हे खरं आहे. व्हेनेझुएला या देशामध्ये जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल मिळते. येथे एक लिटर पेट्रोलसाठी १.७ रुपये मोजावे लागतात.

जगभरात सध्या पेट्रोलचे सरासरी दर १.३३ अमेरिकन डॉलर म्हणजेच १०२ रुपये प्रति लिटर इतके आहेत. भारतामध्ये मागील काही आठवड्यांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दराने याआधीच शंभरी ओलांडली आहे. भारतामध्ये पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर मार्च आणि एप्रिलमध्ये वेळोवेळी इंधनाचे दर सातत्याने वाढले आहेत. अजूनही ही दरवाढ सुरूच आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये राज्य सरकारांकडून आकारण्यात येणाऱ्या व्हॅट आणि इतर करांमुळे इंधनाचे दर वेगवेगळे आहेत. पेट्रोलचे भारतातील सरासरी दर हे ११३ रुपये प्रति लिटर इतके आहेत.

जगात तेलसाठे असणारे काही देश आहेत जिथे इंधन म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल जवळजवळ मोफत किंवा कवडीमोल दरात मिळते. उदाहरण द्यायचे झाले तर लिबियामध्ये पेट्रोल २.४० रुपये प्रति लिटर दराने विकले जाते, तर इराणमध्ये हाच दर चार रुपये प्रति लिटर इतका आहे. ही माहिती ‘एपीआय’च्या माध्यमातून समोर आलेली आहे, जे जगातील १३० देशांमधील इंधनाचे दर आणि १५० देशांमधील विजेच्या दरांवर लक्ष ठेवून असतात. दर आठवड्याला जगभरातील या १३० देशांमधील इंधनाच्या दरांची तर वीज दरांची यादी दर तीन महिन्यांनी यादी अपडेट केली जाते.

इंधनाचे दर वेगवेगळे का?
जगभरातील इंधनाच्या दरांमध्ये तफावत जाणवण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्यावर आकारले जाणारे कर. जागतिक स्तरावर सर्व देशांना एकाच दराने तेल आयात करण्यासाठी उपलब्ध असते. मात्र, प्रत्येक देश वेगवेगळ्या प्रमाणात आयात कर आकारतो. त्यामुळेच ग्राहकांना पेट्रोल हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकत घेतल्या जाणाऱ्या इंधनाच्या दरापेक्षा प्रति लिटरमागे अधिक दर देऊन विकत घ्यावे लागते. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये इंधनाच्या दरांमध्ये तफावत आढळून येते.

असे आहेत भारतीय उपखंडातील पेट्रोलचे दर….
भारताच्या शेजारी असणाऱ्या पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर ६१.७५ रुपये प्रति लिटर इतके आहेत. सध्या नेपाळमध्ये १००.१२ रुपये प्रति लिटर, श्रीलंकेमध्ये ८०.५३ रुपये प्रति लिटर तर बांगलादेशमध्ये ७८.५५ रुपये प्रति लिटर या दराने पेट्रोल विकले जात आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये दोन आठवड्यांत इंधनाचे दर प्रति लिटरमागे १० रुपयांनी वाढले आहेत. भारतीय उपखंडामध्ये सर्वाधिक महाग पेट्रोल भारतातच मिळते.

सर्वात महागडे पेट्रोल हाँगकाँगमध्ये
जगातील सर्वात महाग पेट्रोल हाँगकाँगमध्ये मिळते. येथे एक लिटर पेट्रोलसाठी तब्बल १७५ हून अधिक रुपये मोजावे लागतात. सर्वात महागडे पेट्रोल मिळणाऱ्या देशांच्या यादीमध्ये सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक दुसऱ्या स्थानी आहे. येथे पेट्रोल १५० रुपये प्रति लिटरहून अधिक महाग मिळते. नेदरलॅण्डमध्येही पेट्रोल महाग आहे. येथेही साधारण १५० रुपयांच्या आसपास पेट्रोलचे दर आहेत. महागडे पेट्रोल मिळणाऱ्या देशांमध्ये नॉर्वे आणि ग्रीसचाही समावेश होतो. भारतही महागडे पेट्रोल मिळणाऱ्या देशांच्या यादीत इतर शेजारच्या देशांच्या तुलनेत वरच्या स्थानी आहे.

सर्वात स्वस्त पेट्रोल मिळणारा देश कोणता?
एकीकडे भारतात विक्रमी दराने पेट्रोल विक्री होत असतानाच दुसरीकडे व्हेनेझुएला या देशात जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल मिळते. येथे पेट्रोलचे दर १.७ रुपये प्रति लिटर इतके आहेत. दक्षिण अमेरिका खंडातील या देशात मुबलक तेलसाठे आहेत. व्हेनेझुएलामध्ये फार मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे असल्याने हा देश मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची निर्यात करतो. म्हणूनच या ठिकाणी फार स्वस्त इंधन मिळते. याशिवाय कुवैत, अल्जेरिया, अंगोला या देशांचाही सर्वात स्वस्त इंधन मिळणाऱ्या देशांच्या यादीत समावेश होतो.

अमेरिकेत इंधनाचे दर सरासरी ९२.५८ रुपये प्रति लिटर
साधारणत: श्रीमंत देशांमध्ये इंधन आणि विजेचे दर हे अधिक असतात. तसेच इंधनाची आयात करणाऱ्या देशांमध्येही अशीच परिस्थिती असते. दुसरीकडे इंधनाची निर्मिती करणाऱ्या देशांमध्ये दर फारच कमी असल्याचे दिसून येते. मात्र, अमेरिकेसारखे देश याला अपवाद आहेत. अमेरिकेची अर्थव्यवस्था सक्षम असूनही येथील इंधनाचे दर नियंत्रणात आहेत. अमेरिकेतील इंधनाचे दर हे साधारणपणे लिटरमागे ९२.५८ रुपये इतके आहेत.

Share