लता दिदींच्या स्मारकाबाबत देशानं विचार करण्याची गरज – राऊत 

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारावे अशी मागाणी भाजपचे आमदार राम कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राम कदम यांच्या मागणीसंदर्भात संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर संजय राऊत म्हणाले, काहीजण त्यांच्या स्मारकाबद्दल बोलत असले तरी त्याचं स्मारक करणं सोपे नाही आहे. त्या काही राजकारणी नव्हत्या. त्यांचं असं व्यक्तीमत्व होतं की त्यांचं स्मारक करणं सोपं नाही आहे. त्या स्वत: एवढ्या मोठ्या व्यक्ती होत्या की देशालाही विचार करावा लागेल त्यांच्या स्मारकाबद्दल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलीय.

भाजप आ. राम कदम यांची मागणी काय ?
राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लतादीदींचं स्मृती स्थळ शिवाजी पार्कात उभारण्याची मागणी केली आहे. दादरच्या शिवाजी पार्कात लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या शिवाजी पार्कात लतादीदी पंचतत्त्वात विलीन झाल्या, त्याच ठिकाणी त्यांचं स्मृती स्थळ उभारण्यात यावं. जनतेच्या मागणीचा सन्मान करून तात्काळ हे स्मृती स्थळ निर्माण केलं पाहिजे, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.

Share