मनपाच्या नोकरभरतीला अजूनही मुहूर्त लागलेला नाही

औरंगाबाद महानगर पालिकेची महत्वाची पदे रिक्त आहेत त्यामुळे दैनंदिन कामकाजावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. शिवाय निवृत्त अधिकाऱ्यांना पदभार द्यावा लागतो आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने शहर अभियंता, नगररचना विभागाचे उपसंचालक, तीन कार्यकारी अभियंत्यांसह एकूण १६ अधिकारी प्रतिनियुक्तीवर देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. पालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी यासंदर्भात २६ एप्रिल रोजी राज्याच्या नगरविकास खात्यास पत्र पाठवले आहे.

 मात्र शहर अभियंत्याचा पदभार देण्यासाठी सक्षम अधिकारी मिळाला नाही. त्यामुळे प्रशासक पांडेय यांनी शासनाच्या मंजुरीनंतर पानझडे यांनाच शहर अभियंता म्हणून सुरुवातीला सहा महिने आणि त्यानंतर पुन्हा सहा महिने अशी दोन वेळा मुदतवाढ दिली.शहर अभियंता सखाराम पानझडे गतवर्षी जून महिन्यात सेवानिवृत्त झाले असले तरी ही त्यांना काम कराव लागत आहे.

कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हेदेखील सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी दिली आहे. नगररचना विभागाचे उपसंचालकपददेखील रिक्त आहे. या पदाचा कार्यभार पूर्वी नगररचनाकार जयंत खरवडकर यांना दिला होता. ते सेवानिवृत्त झाल्यावर उपअभियंता ए. बी. देशमुख यांच्याकडे उपसंचालकपदाचा कार्यभार आहे. कार्यकारी अभियंत्यांची तीन पदे रिक्त आहेत.

सध्या उपअभियंत्यांकडेच कार्यकारी अभियंतापदाचा पदभार दिलेला आहे. त्यामुळे शासनाकडे शहर अभियंता, उपसंचालक नगररचना व तीन कार्यकारी अभियंता यासह एकूण १६ पदावर प्रतिनियुक्तीने अधिकारी पाठवण्याची मागणी प्रशासक पांडेय यांनी नगरविकास खात्याकडे केली आहे. उपायुक्त दर्जाचे तीन अधिकारी शासनाने पालिकेला नुकतेच प्रतिनियुक्तीवर दिले आहेत.

Share