पोलिसांनी आम्हाला चहा-पाण्यासाठी बोलावले अन् अचानक अटक केली; मनसे कार्यकर्त्यांचा आरोप

अहमदनगर : पोलिसांनी आम्हाला चहा-पाण्यासाठी बोलावले आणि अचानक अटक केली. तसेच आम्हाला कसलीही संधी न देता पोलिसांनी आम्हाला न्यायालयात हजर केले, असा आरोप संगमनेर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात ४ मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. जर मशिदीवरील भोंगे काढले गेले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे १ मे रोजी झालेल्या सभेत पोलिसांनी घातलेल्या अटींचे पालन न केल्याच्या कारणावरून औरंगाबाद येथे सिटी चौक पोलिसांनी आज मंगळवारी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, उद्याच्या मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध राज्यभर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. त्याअंतर्गत संगमनेरमध्येही पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई केली आहे. या कारवाईबद्दल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांचा निषेध केला आहे.

संगमनेर येथे मनसे पदाधिकारी शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत पोलिसांच्या निषेधाचा ठराव करण्यात आला. शरद गोर्डे यांनी सांगितले की, काहीही कारण नसताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी चहा-पाण्यासाठी बोलावून चर्चा करण्याचा बनाव केला. अचानकपणे संगमनेरमध्ये असलेल्या धडक कृती दलाच्या पथकांना बोलावून कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यांना रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सर्वांचे मोबाईलही पोलिसांनी बळजबरीने काढून घेतले होते.

न्यायालयात वकील श्रीराम गणपुले यांची भेट झाली. त्यांनी कार्यकर्त्यांची बाजू मांडली. पोलिसांनी ९ एप्रिलची निवेदन दिल्याची खोटी घटना सांगून कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वकिलांनी कार्यकर्त्यांची बाजू मांडल्याने सर्वांची सुटका झाली, असे शरद गोर्डे यांनी सांगितले. या विषयाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दखल घेतली असून पोलिस निरीक्षक देशमुख यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शरद गोर्डे यांनी दिली. नगर जिल्ह्यात कुठेही मनसे पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, फक्त संगमनेरमध्येच का झाली? यामागे कोण आहे? येथे मनसे पक्ष वाढू नये, असा कोणाचा प्रयत्न आहे का? अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष अशोक शिंदे, शहराध्यक्ष तुषार ठाकूर, तालुका सरचिटणीस दीपक वर्पे, रामा शिंदे, तालुका उपाअध्यक्ष प्रशांत दातीर, संदीप गाडेकर आदी उपस्थित होते.

Share