कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना स्पष्ट निर्देश

मुंबई : मनसेने मशिदींवरील भोंग्यांविरोधात उद्या राज्यभर आंदोलन करणार असल्याचे जाहीर केल्याने सध्या पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. दरम्यान, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कट आखण्यात आला असल्याचा अलर्ट गुप्तचर विभागाने दिला आहे. इतर राज्यामधील काही लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात, अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचे गृह विभागाने म्हटले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात ४ मेपर्यंतचा अल्टीमेटम राज्य सरकारला दिला आहे. जर मशिदीवरील भोंगे काढले गेले नाहीत तर मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे १ मे रोजी झालेल्या सभेत पोलिसांनी घातलेल्या अटींचे पालन न केल्याच्या कारणावरून औरंगाबाद येथे सिटी चौक पोलिसांनी आज मंगळवारी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी होणाऱ्या मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर आज वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत चर्चा केली. या बैठकीत झालेल्या चर्चेचा तपशील आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रालयाला सांगितले की, “कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी पोलिसांनी घ्यावी, यासाठी कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नये”.

https://twitter.com/ANI/status/1521424187121840128?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1521424187121840128%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmaharashtra%2Fdont-wait-for-anyones-order-cm-uddhav-thackeray-clear-instructions-to-police-aau85

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांचीही फोनवर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस खात्याला दिले आहेत. त्यामुळे पोलिसांना कारवाईसाठी आता कुठल्याही प्रकारचा दबाव नसेल हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, मुंबईत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Share