यूपीमध्ये लवकरच समान नागरी कायदा लागू होणार!

लखनौ : देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी शनिवारी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लवकरच समान नागरी कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असे संकेत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी शनिवारी दिले.

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले, उत्तर प्रदेश राज्य सरकार समान नागरी कायद्याच्या बाजूने आहे. प्रत्येकाने याची मागणी करून त्याचे स्वागत केले पाहिजे. उत्तर प्रदेश सरकारही या दिशेने विचार करत आहे. आम्ही या कायद्याच्या बाजूने आहोत आणि ते उत्तर प्रदेश आणि देशातील जनतेसाठी आवश्यक आहे. भाजपने देशाला दिलेले हे एक महत्त्वाचे आश्वासन असून, त्याची पूर्तता करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (२२ एप्रिल) भोपाळ दौऱ्यावर असताना देशातील सर्व राज्यांमध्ये समान नागरी संहिता लागू होणार असल्याचे संकेत दिले होते. यानंतर समान नागरी कायद्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशात राज्यातही या कायद्यावरून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी मोठा खुलासा करत राज्यात समान नागरी कायदा लवकरच लागू केला जाऊ शकतो, असे म्हटले आहे.

मौर्य म्हणाले, ‘सबका साथ-सबका विकास’ अंतर्गत सर्वांसाठी समान काम होत असेल तर समान नागरी कायदाही लागू केला पाहिजे. बिगरभाजप लोकांनीही या कायद्याची मागणी करावी. आमचे सरकार त्यास अनुकूल आहे. भारत देशासाठी समान नागरी कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. कलम ३७०, राम मंदिराचे बांधकाम आणि समान नागरी कायदा हे भारतीय जनता पक्षाने दिलेली प्रमुख आश्वासने होती. यातील दोन आश्वासने पूर्ण करून पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशाचा विश्वास संपादन केला आहे. आता समान नागरी कायद्याच्या अंमलबजवणीची वेळ आली आहे. या कायद्याला विरोधक पाठिंबा देत नसतील तर त्याचा आम्ही विचार करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Share