पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीच्या वज्रलेपाचा ऱ्हास

अवघ्या महाराष्ट्राच आराध्य दैवत पंढरपूरच्या विठूमाऊलीच्या मूर्तीवर संवर्धनासाठी पुरातत्व खात्याकडून वज्रलेप करण्यात येतो. आतापर्यंत चार वेळा पुरातत्व विभागाकडून मूर्तींवर हे विविध प्रकारच्या रसायनांचे लेपन करण्यात आले होते. मात्र यावेळी केलेला वज्रलेप अत्यंत कमी कालावधीत निघू लागल्याने मंदिर प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेले दोन वर्ष मंदिर बंद असल्याने देव दर्शनही बंद होत.याच काळात २०२० मध्ये पुरातत्व विभागाने विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीच्या पायावर सिलिकॉनचा लेप दिला होता. हा लेप ७ ते ८ वर्ष आहे तसाच राहील असा दावा करण्यात आला होता. दोन वर्षानंतर २ एप्रिल २०२२ रोजी पुन्हा देवाच्या पायावरील दर्शनास सुरुवात झाली आणि आता हा वज्रलेप निघत असल्याचा धक्कादायक प्रकार आला आहे.

पूर्वी या मूर्तीवर पंचामृतांच्या अभिषेकाने मूर्तीची झीज होत होती. त्यामुळे मूर्तीवरील अभिषेक बंद करण्यात आला. तरीही मूर्तीची झीज बंद झाली नाही. रुक्मिणी मातेची मूर्ती ही गंडकी पाषाण म्हणजेच शाळीग्राम दगडाची असून ती अतिशय गुळगुळीत आहे. मात्र या मूर्तीच्या पायाची झीज मोठ्या प्रमाणात होत असल्याने या पायावर दरवेळी वज्रलेप केला जात असतो. आता पायाचे दर्शन सुरु होऊन केवळ आठच दिवस झाले असताना रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेपाचे तुकडे पडल्याने पायाची दुरावस्था झाली आहे .

विठ्ठल रुक्मिणी हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पुढच्या पिढीला देवाचे हे मूळ रूप पाहता यावे यासाठी वारकरी संप्रदाय नेहमीच आग्रही असतो. शासनानेही यात लक्ष घालून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत मूर्ती संवर्धन साठी प्रयत्न करण्याची मागणी भाविकांतून होत आहे.

आता जाणून घेऊयात वज्रलेप म्हणजे काय ?

वज्र म्हणजे दगड, लेप म्हणजे थर. दगडाला वाचवण्यासाठी लावलेला थर म्हणजे वज्रलेप. यालाच एएसआयच्या भाषेत प्रोटेक्टिव्ह कोटिंग म्हणतात. आयुर्वेदात वज्रलेपचा उल्लेख आहे. मंदिरातील मूर्तीची झीज ही वारा, तापमान, आर्द्रता, स्पर्श, गर्दीवर अवलंबून असते. ही झीज रोखण्यासाठी वज्रलेपाची प्रकिया करतात.

वज्र लेप ही रासायनिक प्रकिया आहे या प्रक्रियेत यात वाळूपासून तयार केलेला पदार्थ सिलिकॉन रेझिन आणि पाण्यासारख्या रंगहीन पदार्थ या दोन्हीचा थर मूर्तीवर दिला जातो. हा थर वाळल्यावर मूर्तीची चमक वाढते.पूर्वी मेण आणि राळ वापरुन मूर्तीवरील ‘वज्रलेपा’ची प्रक्रिया पूर्ण केली जायची. आता ‘इफॉक्सी’ नावाचे रसायन आणि मोत्यांची भुकटी यांचा वापर करुन मूर्तीवर लेपन केले जाते. मूर्ती पुन्हा नव्या मूर्तीप्रमाणे दिसू लागते. अत्यंत संवेदनशीलतेने ‘वज्रलेपा’चं काम करावं लागतं.

वज्रलेपनापूर्वी पहिले पाच तास डिटर्जंट सारख्या सौम्य रसायनाने मूर्ती बारकाईने साफ करून घेतली जाते यानंतर ज्या वालुकाशम दगडाची ही मूर्ती आहे त्याच पद्धतीच्या दगडाची पावडर एका रसायनात मिसळून जिथे खड्डे पडले आहेत किंवा जिथला भाग झिजला आहे ती जागा भरण्यात येते.त्यानंतर सिलिकॉन रेझीन आणि एक रंगहीन रसायनाचे मिश्रण करून ब्रशच्या मदतीने मूर्तीवर याचे लेपन करण्यात येते. याला हायड्रोफोबिक कॅरेक्टरचा लेप असेही म्हटल जात.

महाराष्ट्रातील पंढरपूर हे एकमेव मंदिर आहे जिथे पांडुरंगाच्या मूर्तीला हात लावून दर्शन घेता येत होत पण आता मूर्तीची झीज होऊ लागल्याने मूर्तीच जवळून दर्शन घेता येईल का? यावर मंदिर प्रशासन काय नियमावली ठरवणार याकडे वारकरी संप्रदायाचे लक्ष लागल आहे.

Share