राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाचे कलम योग्यच : संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. प्रत्येक कारवाई कायद्याने होत आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था उत्तम आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात मोठे षडयंत्र सुरू आहे. राणा दाम्पत्याच्या माध्यमातून राज्यात धार्मिक उद्रेक घडवून आणून आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू असून, यामागे भाजप आहे; परंतु विरोधकांचा प्रत्येक कट उधळून लावला जात आहे. आता शिवसेना ‘ॲक्शन मोड’मध्ये आली आहे, असा इशारा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज दिला.

‘मातोश्री’ समोर हनुमान चालिसा वाचण्याच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने आज रविवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावर प्रतिक्रिया देताना खा. संजय राऊत म्हणाले, हा न्यायालयाचा निर्णय आहे. याच्याशी सरकारचा संबंध नाही. राणा दाम्पत्य महाराष्ट्रात धार्मिक उद्रेक निर्माण करून सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांकडून लावण्यात आलेले राजद्रोहाचे कलम योग्यच आहे. गुणरत्न सदावर्ते प्रकरणातही हेच झाले. त्यावेळी शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला. आता ‘मातोश्री’वर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. या सगळ्यामागे मोठे कारस्थान, षडयंत्र आहे. धर्माच्या नावाखाली राज्य उलथवण्याचा प्रयत्न झाल्यास राजद्रोहाचा खटला दाखल व्हायला हवा. भीमा-कोरेगाव प्रकरणातही भाजपने अनेक कवी आणि लेखकांविरोधात राजद्रोहाचे कलम वापरले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आता आम्हाला शहाणपण शिकवू नये, असे खा. राऊत यांनी म्हटले.

आता जेलमध्ये बसून हनुमान चालिसा वाचा
भाजपला महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे संघर्ष निर्माण करून दंगलसदृश परिस्थिती निर्माण करायची आहे. मनाप्रमाणे घडले की, मग राज्यपाल त्यांचेच आहेत. त्यांच्यामार्फत शिफारस करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे, असा आरोप खा. राऊत यांनी केला. राणा दाम्पत्य म्हणजे काय टॉलस्टॉय आणि त्याची बायको नव्हेत. आता ते तुरुंगात बसून हनुमान चालिसा वाचू शकतात. राणा दाम्पत्याला हनुमान चालिसा वाचण्याची इतकी हौस होती तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरी जावे, कोर्टात जावे किंवा एखादे सभागृह घेऊन हनुमान चालिसा वाचावी. महाराष्ट्रात हनुमान चालिसा वाचायला बंदी नाही; पण ‘मातोश्री’त घुसून हनुमान चालिसा वाचू द्या, असा हट्ट कशासाठी? तुम्ही ‘मातोश्री’त घुसलात तर आम्हीदेखील घुसू. तुमच्या बापाचे राज्य आहे का? राणा दाम्पत्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून बार उडवला जात आहे; पण एकही गोळी निशाण्यावर लागत नाही. भाजपचा प्रत्येक कट आम्ही अशाप्रकारे उधळून लावू, असा इशाराही राऊत यांनी दिला.

 

नवनीत राणांनी आम्हाला शिकवू नये
नवनीत राणा या बोगस जातीच्या प्रमाणपत्रावर निवडून आल्या आहेत. हा किती मोठा गुन्हा आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक भाजपचे शिलेदार बनले आहेत. भाजप खासदार संसदेत ‘जय श्रीराम’च्या घोषणा देऊन शपथ घेत होते तेव्हा आक्षेप घेणाऱ्या नवनीत राणा होत्या. त्यामुळे यांनी आम्हाला शिकवू नये. पुन्हा प्रसंग आला तर शिवसैनिक त्यांच्या इमारतीपर्यंत जातील. शिवसैनिकांवर ही वेळ कोणी आणली? तुम्हाला खाज होती तर तुम्ही वांद्रे स्टेशनवर हनुमान चालिसा वाचू शकता. ‘मातोश्री’ एक पवित्र जागा आहे. शिवसैनिकांचे बलस्थान आहे. ‘मातोश्री’वर चालून येणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. तुम्हाला हनुमानाची मंदिरे हवी असतील तर आम्ही पत्ते देतो; पण तुम्हाला तिथे न जाता गोंधळ निर्माण करायचा आहे. कारण तुमचे बोलविते धनी वेगळे आहेत. हा गोंधळ निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष सुरक्षा पुरवली आहे, असेही खा. राऊत म्हणाले.

किरीट सोमय्यांवर हल्ला झाला नाही तर त्यांनी स्वतःला नखे मारून घेतली. देशद्रोही माणसाला दगड मारण्याची या देशात पद्धत आहे. ‘आयएनएस विक्रांत’ निधीत घोटाळा केलेल्या व्यक्तीवर पारिजातकाची फुले फेकायची का? लोकांनी रागाने दगड मारला असेल, असे म्हणत संजय राऊत यांनी सोमय्यांवरील हल्ल्याचे एक प्रकारे समर्थनच केले.

Share