मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ट्विट करत ५ जून रोजी होणारा त्यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. याबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, इतर पक्षाचे ५ जून रोजी अयोध्येत काही कार्यक्रम होते. मात्र त्यांनी ते कार्यक्रम रद्द केल्याचं मला प्रसारमाध्यमांकडून समजलं आहे. त्यांना काही सहकार्य हवं असतं तर आम्ही ते केलं असतं. कारण अयोध्य आणि उत्तर प्रदेशात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे., असे संजय राऊत यांनी म्हटंल आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात नेमक्या काय अडचणी आल्या, हे मला माहीत नाही. मात्र भाजपने त्यांच्या बाबतीत असं का करावं? यातून काही लोकांना शहाणपण आलं तर बरं होईल. कारण यामुळे महाराष्ट्रातील नेतृत्वाचं आणि महाराष्ट्राचं नुकसान होतं. आम्हाला या मुद्द्यावरून राजकारण करायचं नाही. आमचा एक मदत कक्ष आहे, कोणाला देवदर्शनाला जायचं असेल तर आम्ही मदत करतो,’ असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
दरम्यान, युवासेनेचे प्रमुख आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हे १५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते रामलल्लांचं दर्शन घेतील. तसंच इस्कॉनच्याही मंदिराला भेट देतील, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे.