गुवाहाटीत शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलवर तृणमूल काँग्रेसचा हल्लाबोल

गुवाहाटी (आसाम) : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांचा मुक्काम असलेल्या आसाममधील गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलला तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आज सकाळी घेराव घालत या हॉटेलसमोर निदर्शने केली. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ब्लू रॅडिसन हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आसाममध्ये पुराचे संकट आले असताना पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी आसाममधील भाजप सरकार महाराष्ट्रातील आमदारांची बडदास्त ठेवण्यात गुंतले असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

महाराष्ट्रात सोमवारी (२० जून) विधान परिषद निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकासमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अचानक बंड पुकारले. सोमवारी रात्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना घेऊन सुरुवातीला गुजरातमधील सूरत येथे गेले. ते शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह अपक्ष आमदारांसोबत सूरतच्या ली मेरेडियन हॉटेलमध्ये तळ ठोकून होते. मात्र, मुंबई ते सूरत हे अंतर फार नसल्याने शिवसेनेच्या दृष्टीने बंडखोर आमदार हे काहीसे ‘अ‍ॅक्सिसेबल’ होते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना सूरतमधून खास विमानाने गुवाहाटीत आणण्यात आले आहे. गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये या बंडखोर आमदारांना ठेवण्यात आले आहे. रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबल्याने या हॉटेलच्या परिसरात आसाम पोलिस आणि निमलष्करी दलाचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांची सरबराई केली जात आहे. या ठिकाणी शिवसेना पोहोचण्याचा धोका कमी आहे. त्यामुळे शिवसेनेतील बंडखोर आमदार काहीसे निश्चिंत होते. मात्र, आज गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते टीएमसीचे प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा यांच्या नेतृत्वाखाली अचानक या हॉटेलच्या परिसरात धडकले. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर जोरदार घोषणाबाजी करत रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला.

कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी हॉटेलच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी असलेले पोलिस सतर्क झाले. पोलिसांनी आंदोलनकर्त्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. हॉटेलमध्ये शिरण्याचा आमचा इरादा नाही. मात्र, केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचे आसाममधील पूरस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे आंदोलन करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

भाजपने महाराष्ट्रातील राजकारण आसाममध्ये खेळू नये. भाजपने शिवसेनेच्या आमदारांची खरेदी-विक्री करण्यासाठी त्यांना रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आणून ठेवले आहे. आसामच्या अनेक भागांमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. पूर स्थितीमुळे आसामच्या नागरिकांचे हाल सुरू आहेत. मात्र, केंद्रातील व आसाममधील भाजप सरकारने पूरग्रस्तांना एका पैशाचीही मदत केलेली नाही. त्याऐवजी भाजपने महाराष्ट्रातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आसाममध्ये आणून घोडेबाजार सुरू केला आहे. त्यासाठी कोट्यवधींचा चुराडा होत आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने आसामच्या नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली.

आसाममधील सुमारे २० लाख लोक पुरामुळे त्रस्त आहेत; पण मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि भाजपचे स्थानिक नेते महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यात व्यस्त आहेत, असा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

दरम्यान, गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने संपर्कात आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना फोडून बंड केल्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेते बंडखोर शिंदे गटाच्या मदतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना समर्थन देणाऱ्या आणि कट्टर भाजप विरोधक तृणमूल काँग्रेस पक्षाने एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठीच आज तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबलेल्या रॅडिसन ब्लू हॉटेलच्या बाहेर आंदोलन केले. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रॅडिसन हॉटेलवर धडक मारत येथून शिवसेनेच्या आमदारांना निघून जाण्यास सांगावे, अशी मागणी केली.

Share