अडीच वर्षांचा प्रवास…फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह! अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (२२ जून) जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नाराज असलेल्या सेना आमदारांना समोर येऊन चर्चा करण्याचे आवाहन करताना शिवसैनिकांना भावनिक साद घातली. उद्धव ठाकरे यांच्या या भाषणावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शेलक्या शब्दांत टीका करीत ‘अडीच वर्षांचा प्रवास… फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह!’ असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बुधवारी सायंकाळी नागरिकांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. त्यांच्या या संवादाला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हास्यास्पद असल्याचे म्हटले तर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी, “पांचट कोट्यांचा शिल्लक कोटा पूर्ण करतायत बहुधा…” असे ट्विट केले आहे. उद्धव ठाकरेंचे भाषण सुरू असतानाच त्यांनी हे ट्विट केले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. सोबतच देशात कोरोना विषाणू आला. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. या काळात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनदेखील लावण्यात आले. लॉकडाऊनमुळे लादलेल्या नियमांमध्ये वेळोवेळी अनेक बदल करण्यात येत होते. यावेळी नागरिकांशी संवाद साधण्याचा एकमेव मार्ग हा फेसबुक लाईव्ह होता. या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला. तसेच त्यांनी मंत्रिमंडळाच्या अनेक बैठकाही ऑनलाईन घेतल्या. कोरोना काळात ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातूनच संवाद साधत असल्याचे पाहायला मिळत होते.

हाच धागा धरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्ह संवादावर टीका केली. महाविकास आघाडी सरकारला सरकार स्थापन होऊन तीन वर्षे झाले आहेत. असे असताना ‘अडीच वर्षांचा प्रवास… फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह!’ असे ट्विट करीत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

Share