उदयनराजे शरद पवारांना भेटणार; साताऱ्यात चर्चांना उधाण

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार  हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्या होणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी शरद पवार आज दुपारीच साताऱ्यात येणार आहेत. यावेळी पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील मुख्य नेत्यांसोबत ते चर्चा करणार असल्याचं समजतंय. पण चर्चा आहे ती उदयनराजे भोसले  यांच्या भेटीची.
शरद पवार यांची भेटी घेण्यासाठी भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेही जाणार आहेत. ही भेट कोणत्या कारणास्थव आहे, हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे उदयनराजे भोसले हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चर्चेत साताऱ्याच्या राजकारणावर खलबतं होतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादीतील नेते आणि उदयनराजे यांच्यात संघर्ष झाल्यानंतर उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडत भाजपत प्रवेश करुन पुढील राजकारण सुरू ठेवलं. मात्र, महाराष्ट्रात आता राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. यामुळे उदयनराजेंना विकास कामं करायची असतील, तर आघाडीतील वरिष्ठ नेत्यांना हाताशी धरुनच काम करावं लागणार आहे. काही महिन्यात नगरपालिका निवडणुका होणार आहेत. यामुळे या भेटीमागे निवडणुकीची पार्श्वभूमी आहे.


उदयनराजे आणि शरद पवार यांच्यातील ही भेट महत्वाची मानली जातेय. आमदार शिवेंद्रराजेंना शह देण्यासाठी उदयनराजेंची ही नवी खेळी आहे का? असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय. अगदी कालच राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांची भेट घेऊन उदयनराजेंनी अर्धा तास चर्चा केली. आमदार मकरंद पाटील हे प्रथमच जलमंदीर या उदयनराजेंच्या निवासस्थानी गेल्याचं पहायला मिळालं. यामुळे कालची भेट आणि आज होणाऱ्या शरद पवार आणि उदयनराजेंच्या भेटीत नक्की दडलंय तरी काय? असा प्रश्न सामान्य सातारकरांना पडलाय. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वाढलेल्या भेटीमुळे उदयनराजे पुन्हा राष्ट्रवादीच्या जवळ जाणार की काय? अशी चर्चा आता दबक्या आवाजात साताऱ्यात सुरू झाल्या आहेत.

Share