मुंबई : ठाकरे सरकारने माझा मनसुख हिरेन करायचा प्लॅन आखला होता; पण देव आणि मोदी सरकारच्या कृपेमुळे माझा जीव वाचला. काल खार पोलिस ठाण्याबाहेर माझ्यावर जो हल्ला झाला, तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर्ड केलेला हल्ला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या संगनमताने माझ्यावर हल्ला झाला, असा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शनिवारी मध्यरात्री खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांना भेटण्यासाठी खार पोलिस ठाण्यात गेलेल्या किरीट सोमय्या यांच्यावर जमावाने दगडफेक करण्यात आली. या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. या हल्ल्यानंतर सोमय्या यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत घेतलेल्या ठाकरे सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला. आतापर्यंत मला तीन वेळा मारण्याचा प्रयत्न झाला; पण महाराष्ट्राची जनता माझ्यासोबत आहे. माझ्यावर पहिला हल्ला वाशिम, दुसरा पुणे व तिसरा हल्ला खार येथे झाला. कालच्या हल्ल्यात शिवसैनिकांनी फेकलेला दगड जरा वरती लागला असता तर मी कायमचा आंधळा झालो असतो; पण सुदैवाने मी बचावलो.
मुंबई पोलिसांनी मला गुंडांच्या हवाली केले
खार पोलिस ठाण्याबाहेर शिवसैनिकांनी काल माझ्यावर केलेला हल्ला हा ठाकरे सरकार स्पॉन्सर्ड होता. मी पोलिस ठाण्यात रात्री साडेनऊ वाजता येणार असल्याचे अगोदरच कळवले होते. त्यानुसार शिवसेनेचे ७० ते ८० गुंड अगोदरच पोलिस ठाण्याबाहेर जमले होते. काहीजण पोलिस ठाण्याच्या आवारात उभे होते. आत जातानाही त्यांनी मला शिवीगाळ केली. गाडी थांबवण्याचा प्रयत्न झाला. पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर मी बाहेर पडण्यापूर्वी माझ्यावर हल्ला होऊ शकतो, असे त्यांना सांगितले होते. तेव्हा पोलिसांनी आम्ही शिवसैनिकांना दूर नेले आहे, सगळी चोख व्यवस्था केली आहे, असे सांगितले. मात्र, पोलिस ठाण्यातून बाहेर पडताच पोलिसांनी मला शिवसेनेच्या गुंडांच्या हवाली केले. आठ कमांडो होते म्हणून मी बचावलो. या हल्ल्यासाठी पोलिस आयुक्त संजय पांडे हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, असे सोमय्या म्हणाले.
या दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री कार्यालय आणि पोलिस आयुक्त संजय पांडे सातत्याने संपर्कात होते, असा दावा त्यांनी केला. या सगळ्यानंतर मी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी गेल्यानंतरही पोलिसांनी माझे म्हणणे नीट ऐकून घेतले नाही. पोलिस आयुक्त संजय पांडे यांनीच माझा एफआयआर तयार करून पाठवला. तो वाचल्यानंतर मी त्यावर सही करण्यास नकार दिला. मात्र, स्थानिक पोलिस अधिकाऱ्याने आता हाच एफआयआर ग्राह्य धरला जाणार, अशा शब्दांत मला दटावले. या सगळ्याविरोधात मी आज सकाळी केंद्राचे कॅबिनेट सचिव राजीवकुमार गौबा यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी गृहसचिव अजय कुमार भल्ला यांना याविषयी चौकशी करायला सांगितले आहे. उद्या सोमवारी भाजपचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांना भेटण्यासाठी दिल्लीत जाणार आहे, असेही सोमय्या यांनी सांगितले.
ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणारच!
उद्धव ठाकरे यांचे सरकार हे माफिया सरकार आहे. मनसुख हिरेनची हत्याही ठाकरेंनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनीच केली. उद्धव ठाकरेंच्या नेत्यांना आम्ही बघून घेऊ. विरोधकांना गाडण्याची भाषा ठाकरे सरकार करत आहे. उद्धव ठाकरेंकडून पोलिस विभागाचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप करून सोमय्या म्हणाले, ठाकरे सरकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. ठाकरे सरकारचे सर्व घोटाळे बाहेर काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा सोमय्यांनी यावेळी दिला.