१०८ फूट उंच हनुमान मूर्तीचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण

नवी दिल्ली : देशभरात आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील मोरबी येथील भगवान हनुमानाच्या १०८ फूट उंच मूर्तीचे शनिवारी अनावरण करण्यात आले. मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हनुमानाच्या मूर्तीचे अनावरण करून जनतेला हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. पवनपुत्राचे आशीर्वाद सर्वांवर असोत, असे मोदी याप्रसंगी म्हणाले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशभरातील आणि जगभरातील हनुमान भक्त आणि रामभक्तांसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. अशा प्रकारे देशातील चार वेगवेगळ्या ठिकाणी हनुमानजींच्या १०८ फूट उंचीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येत आहे. आपण शिमल्यात अनेक वर्षांपासून असाच पुतळा पाहतो आणि आज आपण हा दुसरा पुतळा पाहत आहोत. दक्षिणेतील रामेश्वरम आणि पश्चिम बंगालमध्ये आणखी दोन मूर्ती बसवण्याचे काम सुरू आहे. हनुमान ही अशी शक्ती आहे ज्याने सर्व जंगलात राहणार्‍या प्रजाती आणि वन बांधवांना आदर देण्याचा अधिकार दिला आहे, असेही ते म्हणाले.

https://twitter.com/AHindinews/status/1515206944172441600?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1515206944172441600%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Findia%2Fhanuman-jayanti-2022-prime-minister-narendra-modi-unveiled-108-feet-high-hanuman-statue-1050908

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात चार धाम प्रकल्पांतर्गत भगवान हनुमानजी यांच्या चार मूर्ती चार दिशांना बसविण्यात येणार असून, या चार मूर्तींपैकी मोरबी येथील ही दुसरी मूर्ती आहे. मोरबी येथील बापू केशवानंद यांच्या आश्रमात या भव्य मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. देशाच्या पश्चिमेला स्थापित केलेला हा भव्यदिव्य पुतळा आहे. या मालिकेतील पहिली उंच मूर्ती २०१० मध्ये हिमाचल प्रदेशात शिमला येथे बसवण्यात आली होती. मोरबी येथे २०१८ मध्ये भगवान हनुमानजींच्या भव्य मूर्तीच्या उभारणीला सुरुवात झाली होती. या मूर्तीची किंमत सुमारे १० कोटी रुपये आहे. या मूर्तीच्या अनावरण सोहळ्यास पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. त्याचवेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि अन्य नेते कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

Share