असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप पाहिलेत! मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर निशाणा

मुंबई : मशिदीवरील भोंग्यांवरून राज्यातील राजकारणात खळबळ माजवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज १ मे रोजी संध्याकाळी औरंगाबादेत ऐतिहासिक सभा होत आहे. यावेळी ते राज्य सरकारवर पुन्हा एकदा बरसण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेआधीच मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. असे भोंगेधारी, पुंगीधारी फार पाहिले आहेत, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर खरमरीत टीका केली.

आगामी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाचा चौकोनी आढावा घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेब-उपक्रमाच्या समारोप सत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर आपली सविस्तर भूमिका मांडली. सध्या हिंदुत्वाचे वातावरण निर्माण होत असून, एक नवा खेळाडू येत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, अशा खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. कारण, असे खेळाडू कोणत्या मैदानांमध्ये कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवले आहे. कधी मराठीचा, हिंदुत्वाचा खेळ सुरू आहे. असे खेळ महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहेत. दोन वर्षांचा कालखंड प्रचंड मोठा आहे. त्या कालखंडात सर्व बंद होते. नाटक, थिएटर, सिनेमा सगळे बंद होते. त्यामुळे आता फुकटात करमणूक करून मिळत असेल तर का नको? असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता लगावला.

गाजराची पुंगी वाजली तर वाजली…
मी शिवसेनेची ओळख करून देण्याची गरज नाही. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे हे मी विधानसभेतही बोललो आहे आणि ते लपवण्याची गरज नाही. आता काहीजण हे करून बघू, ते करून बघू बोलत आहेत. सध्या मार्केटिंगचा जमाना आहे. नाही आवडले तर परत करा. तसेच हे फळलं तर ठीक नाही तर परत. गाजराची पुंगी वाजली तर वाजली. असे भोंगेधारी, पुंगीधारी फार पाहिले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

राज ठाकरेंचा अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न
भोंग्यांचा विषय गाजलेला वाटत नाही. मला माझ्या जनतेच्या जिवाची पर्वा आहे. केंद्राने भोंग्याबाबत धोरण ठरवावं. राज ठाकरेंचा अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न आहे. हिंदुत्वाचा डंका आम्हाला वाजवावा लागत नाही. शिवसेनेने कधीचं झेंडा बदलला नाही, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आता मुख्यमंत्र्यांच्या या टीकेवर राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत काय उत्तर देतात याबाबत उत्सुकता आहे.

Share