विराट कोहलीला विश्रांतीची गरज : रवी शास्त्री

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताचा माजी कर्णधार विराट काेहलीबाबत माेठे विधान केले आहे. विराट कोहली याला विश्रांतीची गरज आहे. कोहलीला इंग्लंड दौऱ्याअगोदर विश्रांती दिली जावी, असे रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.

मागील काही महिन्‍यांपासून विराट काेहलीने आपला फाॅर्म गमावला आहे. सातत्‍याने येणार्‍या अपयशामुळे विराटवर क्रीडा समीक्षकांनी टीकेची झाेड उठवली आहे. मागील वर्षी विराटने टी-२० आणि वन डे सामन्यातील कर्णधारपदाची जबाबदारी साेडली. यानंतर काही दिवसांत कसाेटी कर्णधारपदही तडकाफडकी साेडले. आता दमदार कमबॅकसाठी प्रयत्‍न करत असलेल्‍या विराटबाबत रवी शास्त्री यांनी माेठे विधान केले आहे. रवी शास्त्री यांनी म्‍हटले आहे की, ‘भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याला विश्रांतीची गरज आहे. विराट पुढील ६-७ वर्षे भारतीय टीमसाठी सातत्यपूर्ण कामगिरी करेल मात्र त्याला सध्या विश्रांतीची गरज आहे, विराट कोहलीला इंग्लंड दौऱ्याअगोदर विश्रांती दिली जावी. ती दोन किंवा दीड महिन्यांची असायला हवी.’ आयपीएल २०२२ मध्ये विराटकडून सर्वांच्या खूप अपेक्षा आहेत. आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वांत जास्त धावाही विराट कोहलीच्याच नावावर आहेत. त्यामुळे रवी शास्त्रींच्या या सल्ल्यानंतर विराट कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

आयपीएलच्या १५ व्या हंगामात विराट कोहली आपल्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नाही. सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोहलीला गेल्या १०० सामन्यामध्ये एकही शतक झळकवता आलेले नाही. आयपीएलचा सध्याचा हंगाम सुरू होण्यापुर्वी त्याने भारतीय संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे कर्णधार पद सोडले. मात्र, कर्णधारपद सोडल्यानंतरही तो चांगली कामगिरी करू शकलेला नाही.

Share