सातारा : कोल्हापूरहून आळंदीला वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला भरधाव येणाऱ्या आयशर टेम्पोने पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला, तर ३० जण गंभीर जखमी आणि ११ जण किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. आज रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गावर शिरवळ (ता.खंडाळा) येथे हा भीषण अपघात घडला.
आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मंगळवारी (२१ जून) सायंकाळी ४ वाजता आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटी येथील ४३ वारकरी ट्रॅक्टर ट्रॉलीमधून आळंदीला जात होते. रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास शिरवळ (ता.खंडाळा) येथील पुणे बसथांब्यावर वारकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून भाजीपाला घेऊन पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोने जोराची धडक दिली.
ही धडक इतकी जोरदार होती की, टेम्पोच्या धडकेने ट्रॉली उलटून वारकरी ट्रॉलीतून बाहेर फेकले गेले आणि महामार्गावर पडले. या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला, तर ३० जण गंभीर जखमी तर ११ जण किरकोळ जखमी झाले. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव मायाप्पा कोंडीबा माने (वय ४५, रा.भादोले, ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर) असे आहे. या अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमी वारकऱ्यांना त्वरित शिरवळ येथील जोगळेकर रुग्णालयात दाखल केले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांपैकी मारुती भैरवनाथ कोळी (वय ४०, लाहोटी) आणि अन्य एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
सर्व जखमींवर शिरवळ व खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमी रुग्णांना सातारा येथील नाना पाटील रुग्णालयात दाखल केले आहे.