मुंबई : नूतन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. अर्थात आमचे जावई आहेत. आम्ही अनेकदा जावईहट्ट पुरवत आलो आहोत. यापुढे जावयांनी आमचा हट्ट पुरवावा, अशी मिश्किल मागणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.
गेल्या काही दिवसांतील राज्यातील सत्तासंघर्षानंतर रविवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. विधानसभेत आवाजी पद्धतीने घेण्यात आलेल्या मतदानात राहुल नार्वेकर यांनी १६४ मते मिळवत बाजी मारली. राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. या अभिनंदन प्रस्तावावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक शैलीत केलेले भाषण चांगलाच चर्चेचा विषय ठरले. हे भाषण ऐकून अजितदादा नव्या विधानसभा अध्यक्षांचे अभिनंदन करत होते की, त्यांना शालजोडीतील टोले लगावत होते, हा प्रश्न अनेकांना पडला. अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करताना त्यांच्याकडे विरोधकांचा हट्ट पुरविण्याची मागणी केली.
कोणत्याही पक्षात गेल्यावर नेतृत्त्वाच्या जवळ जाणे हे राहुल नार्वेकर यांचे कौशल्य आहे. शिवसेनेत असताना ते आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी मला आपलेसे करून टाकले. त्यानंतर भाजपमध्ये गेल्यावर राहुल नार्वेकर देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाऊ लागले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकरांना आपलेसे करून घ्यावे, नाहीतर तुमचे काही खरे नाही, असे अजित पवार यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
अजित पवार म्हणाले, राहुल नार्वेकर फार हुशार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सांगितले, मी उमेदवार होईन; पण मला अपयश आले तर मला कुठे तरी सदस्य केले गेले पाहिजे. तेव्हा त्यांना विधान परिषदेचे सदस्यपद मिळाले. तेथे त्यांनी उत्तम काम केले. त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही उत्तम काम केले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणूनही उत्तम काम केले. त्यामुळे ते विधानसभा अध्यक्ष म्हणूनही उत्तम काम करतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.
यावेळी अजित पवार यांनी राहुल नार्वेकर यांना इतक्या लहान वयात विधानसभेचे अध्यक्ष मिळाल्याच्या मुद्द्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही चिमटे काढले. भाजपमधील जुन्याजाणत्या नेते कार्यकर्त्यांसाठी ही आश्चर्यकारक बाब आहे; परंतु सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन साहेब जे तुम्हाला कोणाला जमले नाही, ते आमच्या राहुल नार्वेकरांनी तीन वर्षांमध्ये करून दाखवले. हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे, असे सांगून पवार म्हणाले, या सभागृहात समोरच्या बाजूला पाहतो, तेव्हा मुळचे भाजपचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेले मान्यवर जास्त दिसतात. आमच्या मंडळींना बघून मला भाजपमधील मूळ मंडळींचे वाईट वाटते. आज भाजपमध्ये पदावर असलेली मंडळी आमच्याकडून गेलेली आहेत. भाजपमधील मूळ मान्यवरांना बाजूला सारून ते पदावर बसले आहेत. पहिली लाईन बघितली तरच हे लक्षात येईल, अशी खोचक टीका अजित पवार यांनी केली. मी सुधीर मुनगंटीवार यांचे नाव सुचवले होते. म्हटले, काय बडबड करायची ती तिथे बसून करावी. किती तास, किती मिनिटे, किती सेकंद, किती वर्ष सगळे सागू द्यावे, असे म्हणत अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवारांना टोला लगावला.