एकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नाही : आदित्य ठाकरे

मुंबई : आज सभागृहात आल्यानंतर शिवसेनेतील एकही बंडखोर आमदार माझ्या डोळ्याला डोळा भिडवू शकत नव्हता. मग ते आपल्या मतदारसंघात जाऊन शिवसैनिकांना कशाप्रकारे सामोरे जाणार आहेत, असा सवाल माजी पर्यावरणमंत्री आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. आज पाहिल्या दिवशी नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले. तत्पूर्वी, विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि नार्वेकर यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आदित्य ठाकरे यांचे सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत भाषण करताना नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला म्हटले की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुमचे ऐकले नाही. त्यामुळे तुम्ही हा मार्ग पत्करला; पण असे काही पाऊल उचलताना आमच्या कानात नक्की सांगा. मुनगंटीवार यांना प्रत्त्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, अडीच वर्षापूर्वी भाजपने शिवसेनेने सांगितलेले ऐकले असते तर आज ही वेळ आली नसती.

सभागृहातून बाहेर पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, बंडखोर आमदारांपैकी एकही जण माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नव्हता. इकडे त्यांची ही अवस्था आहे, तर ते आपल्या मतदारसंघात गेल्यानंतर शिवसैनिकांना कसे सामोरे जाणार आहेत. आता या बंडखोर आमदारांना सुरक्षाव्यवस्थेसह बसमधून नेले जाते; पण हे किती दिवस चालणार? आज हे सर्वजण नैतिकतेच्या चाचणीत अपयशी ठरले आहेत. बंड केलेल्या आमदारांची आज नैतिक परीक्षा झाली. ते सर्वजण खाली किंवा इकडे तिकडे बघत होते. ते माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहत नव्हते.

शिवसेनेने जारी केलेल्या ‘व्हीप’ शिंदे गटाने मान्य केला नाही. आमच्याविरोधात त्यांनी मतदान केले. आज ते पोलिसांच्या संरक्षणात आले. आले नाही तर आणले गेले. हे किती दिवस चालणार आहे. फुटलेल्या आमदारांची नैतिक चाचणी झाली पाहिजे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Share