कोणते कपडे घालायचे ते ‘हेच’ ठरवणार? -सुळे

नवी दिल्ली : लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना राष्ट्रवादी काॅग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी कर्नाटकातील हिजाब मुद्यांवर भाजप सरकारला कोंडी पकडण्याचा प्रयत्न केला.

खा. सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, कोणते कपडे घालायचे ते हेच ठरवणार, काय खायचं ते हेच ठरवणार, कुठे जायचं, कधी जायचं हेच ठरवणार, काय बोलायचं, काय नाही बोलायचं ते हेच ठरवणार, काय शेयर करायचं काय फॉरवर्ड करायचं हेच ठरवणार, मग यांना हुकुमशाही म्हंटल तर आणीबाणीचा राग हे आमच्यावर काढणार, यांच्यावर टीका केली तर राष्ट्रद्रोहाचा खटला आमच्यावर टाकणार, लोकशाहीसाठी आंदोलन केलं तर आम्ही आंदोलनजीवी म्हणून आम्हाला हेटाळणार. लोकहो आता तुम्ही काय करणार, असा खणखणीत सवाल सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला केला आहे.

नेमकं प्रकरण काय?
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब (हेडस्कार्फ)वरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.

Share