मराठी पाट्यावरुन कुठे नाराजी तर कुठे श्रेय वादाची लढाई

मुंबई :  राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी (१२ जानेवारी) घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कुणी या निर्णयाचं स्वागत करत आहे, कुणी याचं श्रेय घेत आहे तर कुणी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत.

राज्यात ज्या व्यापारांचा मराठी पाटीला विरोध आहे. त्यांना एकच प्रश्न आहे पाटी बदलण्याच खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा असे सुचक ट्विट मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केले आहे. त्यामुळे मराठी पाट्याच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे.

निर्णयाचे स्वागत
गुरुवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी या निर्णयाचं स्वागत केले आहे. राज ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध करुन राज्य सरकारचे अभिनंदन केले. तसेच आता कच खाऊ नका. या निर्णयाची अंमलबजावणी नीट करा असा सल्लाही राज ठाकरे महाविकास आघाडीला दिला आहे. सोबतच हे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकाचे असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सरकारच्या निर्णयाला विरोध
फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. दुकानांच्या पाटीवर मोठ्या अक्षरात नाव लिहिताना कोणत्या भाषेचा वापर कराव हा व्यापाऱ्यांचा अधिकार आहे. दुकानदारांना व्होटबँक पॉलिटिक्सपासून दूर ठेवा. दुकानाला मराठी पाट्या लावू, पण मोठ्या अक्षरातील मराठी पाट्यांची सक्ती नको,  सरकारचा निर्णय व्यापाऱ्यांवर अन्यायकारक ठरेल. अशी भुमिका विरेन शाह यांनी घेतली.

तर दुसरीकडे  एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील म्हणतात, सरकारला जर मराठी वर प्रेम असेल तर सरकारी खर्चातून दुकानाच्या पाट्या बदलून द्याव्यात, दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत आणि पाट्या कशा बदलणार. जेव्हा जेव्हा निवडणूक येते तेव्हा मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता हे मुद्दे काढता, ही नौटंकी असल्याचं न समजायला लोक मुर्ख नाहीत. मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या मिळणार का? सध्या मराठी तरूण वर्ग बेरोजगार आहे त्यांच्या साठी तुम्ही काही केल का ? दुकानाच्या पाट्या मराठीत करुन मराठीचा प्रचार आणि प्रसार होणार आहे का ? असा सवाल जलील यांनी उपस्थितीत केला आहे.

Share