औरंगाबादेतील १०८ पैकी ३ रस्त्यांच्या कामाला आजपासून सुरुवात

औरंगाबाद : आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी केलेल्या सूचनेनुसार १०८ पैकी तीन रस्त्यांच्या कामांना आज, मंगळवारपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात केली जाणार आहे. या रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासून त्यानंतर अन्य रस्त्यांच्या कामांना परवानगी दिली जाणार आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या ३१७ कोटींच्या निधीतून शहरातील १०८ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे केली जाणार आहेत. या कामांच्या थर्ड पार्टी इन्स्पेक्शनसाठी ‘स्मार्ट सिटी’ने मुंबई येथील आयआयटीशी करार केला आहे. या करारानुसार रस्त्यांची कामे सुरू होण्यापूर्वी आयआयटीच्या तज्ज्ञांनी ज्या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत त्या रस्त्यांची पाहणी करून कंत्राटदार, पीएमसी आणि संबंधित अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना करणे आवश्यक आहे.

त्यासाठी प्रा. डॉ. धर्मवीर सिंह औरंगाबादच्या दोन दिवसांच्या भेटीवर आले होते. त्यांनी रविवार आणि सोमवार असे दोन दिवस रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ‘स्मार्ट सिटी’ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, स्नेहा बक्षी, अर्पिता शरद, ‘पीएमसी’चे समीर जोशी आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. धर्मवीर सिंह म्हणाले, ‘रस्त्यांच्या पाहणीच्या वेळी संबंधित कंत्राटदार आणि पीएमसीचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. त्यांना रस्त्यांच्या बांधणीबद्दल सूचना करण्यात आल्या. शहरात करण्यात आलेल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे आम्ही पाहिली. या कामांमध्ये बदल करावा लागेल. सुनियोजित पद्धतीने कामे करावी लागतील असे त्यांना सांगितले आहे. रस्त्याच्या बांधणीची पद्धत बदलावी लागणार आहे. त्यामुळे सरसकट सर्व रस्त्यांची कामे सुरू करणे योग्य होणार नाही.’ ‘तीन पॅकेजमध्ये १०८ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पॅकेजमधील एका रस्त्याचे काम प्रायोगिक तत्त्वावर पूर्ण करा. या कामाची पाहणी पुन्हा केली जाईल. काम समाधानकारक आहे असे लक्षात आले, तर उर्वरित कामाला परवानगी दिली जाईल,’ असे प्रा. डॉ. धर्मवीर सिंह यांनी सांगितले. अरुण शिंदे म्हणाले, ‘प्रत्येक पॅकेजमधील एक अशा तीन रस्त्यांची कामे सुरू केली जातील. आवश्यक तो दर्जा राखून ही कामे केली जाणार आहेत.’

या ३ रस्त्यांची कामे सुरू

– औरंगपुरा ते नेहरुभवन

– शारदा मंदिर आणि सरस्वती भुवन शाळेच्या मधून जाणारा रस्ता

– भाग्यनगरचा रस्ता (पूर्वीच्या औरंगाबाद अशोक हॉटेलच्या बाजूने जाणारा रस्ता)

Share