यशोमती ठाकूरच अचलपूर घटनेच्या मास्टरमाईंड 

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे झेंडा काढण्यावरून दोन गटात वाद होऊन त्याचे पर्यावसान दगडफेकीत झाले. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर याच अचलपूरमधील घटनेच्या मास्टरमाईंड असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे.

अचलपूर येथील घटनेच्या विरोधात भाजपतर्फे आज निदर्शने करण्यात आली. त्यावेळी अनिल बोंडे यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले. अचलपूर घटनेमागे अभय म्हात्रे हा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे; परंतु या घडलेल्या घटनेमागे अमरावतीच्या पालकमंत्री आणि महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर याच मास्टरमाईंड आहेत. यावेळी त्यांनी १२ नोव्हेंबर रोजी घडलेली घटना आणि त्यानंतर मातंग समाजाच्या मुलांनी ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बघिल्यानंतर दिलेल्या ‘भारत माता की जय’ घोषणेनंतर झालेला हल्ला या सर्व घटनांमागे यशोमती ठाकूर याच असल्याचा आरोप बोंडे यांनी केला.

दरम्यान, याबाबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, ‘अल कायदा’चे जिहादी असल्यासारखे बोंडे सध्या अमरावती जिल्ह्यात वागत आहेत. मागच्या वेळी घडलेल्या दंगलीच्यावेळी बोंडेंना अटक करण्यात आली होती. या सर्व घटनांमागे भाजपचाच हात असून, दिल्लीत तिन्ही महापालिका एकच करण्यात आल्या असून, आता त्या निवडणुका होणार आहेत त्या आधी दिल्लीतील घटना घडली आहे. भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश असून, देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारी या प्रश्नांकडे भाजपने लक्ष देणे गरजेचे असून, राज्यातील कोणत्याही पक्षातर्फे चुकीचे विधान करणे अशोभनीय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाजप सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोपही लोंढे यांनी केला आहे.


काय आहे नेमकं प्रकरण?
अचलपूर शहरातील खिडकी गेट आणि दुल्हा गेट येथील ब्रिटीशकालीन दरवाजांवर दरवर्षी सण-उत्सवप्रसंगी शहरातील नागरिक झेंडे व फ्लेक्स लावतात. यावर्षीसुद्धा झेंडे लावण्यात आले होते. रविवारी (१७ एप्रिल) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास काही समाजकंटकांनी तेथील झेंडा काढल्याने वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दोन गटात मोठा राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेकही केली. घटनेची माहिती मिळताच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच एसआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी मिळून कारवाई केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. या घटनेमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अचलपूर व परतवाडा या दोन जुळ्या शहरात संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली होती. आज तिसऱ्या दिवशी तेथील संचारबंदी दुपारी दोन तास शिथिल करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष अभय माथणे यांना स्थानिक पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे.

Share