यशवंत जाधव हे भीम सैनिक ते लढतील – महापौर 

मुंबई : मुंबई महापालिकेची मुदत आज संपतेय. उद्यापासून मुंबई महापालिकेवर प्रशास नेमण्यात येणार आहे. त्याआधी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी पेडणेकरांनी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी पडलेल्या ईडीच्या धाडीविषयी भाष्य केले आहे.

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ज्यांच्यावर धाडी पडल्या किंवा पडणार होत्या ते भाजपात गेले साधू झाले, शुद्ध झाले. पर्याय असा आहे की, एक तर आमच्यात या नाही तर हे (कारवाईला तयार रहा) घ्या. मात्र आम्ही सैनिक आहोत. यशवंत जाधव हे भीम सैनिक आहेत, भीम पुत्र आहेत. ते लढतील. जे सत्य आहे ते लवकरच सर्वांसमोर येईल. ही कायद्याची आणि कागदाची लढाई असल्याचे त्या म्हणाल्या.

मुंबई महापालिकेवर भगवाच फडकेल

कोरोना काळात मुंबईने चांगलं काम केलं. कोरोना रोखण्यात मुंबई यशस्वी ठरली. देशात अव्वल ठरली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आव्हानांना संधी मानून काम केलं, असं सांगतानाच मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल. शिवसेनेचाच महापौर बसेल, असंही त्या म्हणाल्या. तसेच पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच कोरोना काळात दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी मुंबईकरांचे आभारही मानले.

Share