अवघ्या १२ तासांच्या आत पाच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

मुंबई : राज्य पोलिस दलात कार्यरत असलेल्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीचे आदेश गृहमंत्रालयाने काल काढले होते. मात्र, १२ तासांच्या आतच या पाच अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला गृहमंत्रालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगिती निर्णयामुळे गृह खात्याच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. भाजपने यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

गृहमंत्रालयाने राजेंद्र माने, महेश पाटील, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे या पोलिस अधिकाऱ्यांच्या बढती आणि बदलीचे आदेश बुधवारी जारी केले होते. मात्र, १२ तास लोटण्याच्या आधीच या बदली आदेशाला गृहमंत्रालयाने स्थगिती दिली आहे. तसे परिपत्रक आज गुरुवारी सकाळी गृह मंत्रालयाने काढले आहे. या नव्या आदेशामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. राजेंद्र माने राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदावर कार्यरत होते आणि त्यांना ठाणे शहरात पूर्व प्रादेशिक विभागात अप्पर पोलिस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली होती, तर महेश पाटील यांना पोलिस उपायुक्त पदावरून मुंबईतील वाहतूक विभागात अप्पर पोलिस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली होती. पुण्यातील महामार्ग सुरक्षा पथकात पोलिस अधीक्षकपदी कार्यरत असलेले संजय जाधव यांची ठाणे शहरात अप्पर पोलिस आयुक्तपदी (प्रशासन) तर पंजाबराव उगले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून मुंबईत अप्पर पोलिस आयुक्तपदी (सशस्त्र पोलिस) बढती देण्यात आली होती. तसेच पालघरचे जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मुंबईत अप्पर पोलिस आयुक्तपदी (संरक्षण व सुरक्षा) बढती देण्यात आली होती.

वळसे पाटलांच्या रुपात नामधारी गृहमंत्री -सुधीर मुनगंटीवार

१२ तासांच्या आतच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली आदेशाला गृह विभागाने स्थगिती दिल्याने भाजप नेते आणि माजी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, अजब सरकारची गजब कहाणी आहे. पोलिस विभाग ज्याच्यामुळे अनुशासन असते. खरे तर एखाद्या मंत्र्याच्या नाराजीने बदल्या स्थगित होतात. याच्यापेक्षा जास्त प्रशासकीय व्यवस्थेचे अधःपतन असू शकत नाही. राज्यात वळसे पाटलांच्या रुपात एक नामधारी गृहमंत्री आहे, ज्यांचे कोणी ऐकत नाही. कुणीही उठते आणि त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करते. काही कार्यकारी गृहमंत्री आहेत, ज्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड आपण बघितलेत, जे फोनवर आदेश देतात. काही अदृश्य गृहमंत्री आहेत, पोलिसांचे राजकीयीकरण सुरू आहे. आज पोलिस विभागाचे एवढे राजकीयीकरण झालेय की, आधी पोलिसांना विचारले जाते, तुम्ही काही कारवाई करणार असाल, कायदेबाह्य वागणार असाल, आम्ही सांगू तसे ऐकणार असाल, तर आम्ही तुम्हाला चांगली पोस्ट देतो. नैतिकतेचा, प्रशासनाचा, गुणवत्तेचा ऱ्हास, प्रशासनाचा दर्जा घसरवण्याचे काम या सरकारचे सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

सरकारने बदल्यांचा पोरखेळ चालवलाय -अतुल भातखळकर

“या सरकारने बदल्यांचा पोरखेळ चालवला आहे. या सरकारचा बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात, त्याआधी गृहमंत्र्यांची सही असते. आता १२ तासात त्यावर स्थगिती दिली आहे. स्थगिती का दिली याबाबत सरकारने खुलासा केला पाहिजे,” अशी मागणी भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. गेल्या वेळी जे वाझे प्रकरण झाले त्याचीच ही छोटी आवृत्ती असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या वेळच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाला हे तर सगळे जग मान्य करत आहे. त्याची सीडी आहे, पेन ड्राईव्ह आहेत. म्हणून तर रश्मी शुक्लांना इतका त्रास दिला जात आहे. गुंड, मवाली आणि भ्रष्टाचाराला पाठिशी घालणारे हे सरकार आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Share