जिंतूरमध्ये जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट;दोन जखमी

परभणी : उघड्यावर पडलेल्या जिलेटीनच्या कांड्या मोबाईलच्या बॅटरीला लावल्याने मोठा स्फोट होऊन दोन मुले गंभीर जखमी झाली. ही घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील एकलव्य शाळा परिसरात आज (बुधवार) दुपारी १२ च्या सुमारास घडली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

जिंतूर शहरातील नवीन एकलव्य शाळा परिसरात राहणारे शेख असलम (वय ११) व अनस शाहेद पठाण (वय ९) हे बुधवारी दुपारी घराजवळ खेळत होते. यावेळी रस्त्याच्या बाजूला कचऱ्यात मोठ्या प्रमाणात वायर असलेल्या जिलेटीन कांड्या त्यांना दिसून आल्या. त्या दोघांनी या कांड्या जुन्या मोबाईलच्या बॅटरीला वायरने जोडल्या असता या कांड्यांचा मोठा स्फोट झाला. यावेळी अस्लम शेख याच्या हातात जिलेटीन कांड्या असल्यामुळे त्याच्या हाताला व डोळ्याला जखम झाली. जवळच असलेल्या अनस पठाण याच्याही डोळ्याला गंभीर इजा झाली.

यावेळी नागरिकांनी दोघा जखमींना तातडीने शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींवर प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, जिलेटीनसारखी स्फोटके शहरातील नागरी वस्तीमध्ये आढळून आल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील संबंधित व्यवसाय करणाऱ्यांनी जिलेटीनचा साठा कुठे केला आहे का ? याबाबत महसूल व पोलिस प्रशासनाने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

Share